Blog No.2023/251
Date:- 28th,September 2023.
मित्रांनो,
आज स्व. लता मंगेशकर यांची जयंती. खरं तर आजही लता दीदींच्या
नावापुढे स्व. लिहायचं म्हणजे कससच होतं, लता दीदी आपल्यात नाहीत ही कल्पना करवत नाही
आणि हे असे सारं त्या गेल्यानंतर दिड वर्षांनी होतंय.मग सांगा एक गीत 2013 साली संगीतबद्ध झालेलं, आलं,पण ऐकायला उशिरा मिळालं. अन हृदयात कालवाकालव व्हायला लागली.ऐकताच वेड्यासारखा
मी स्वतःशीच म्हणालो नाही, लता दीदी तुम्ही नाही असं म्हणायचं. गाऊ नका लागेल तर, पण
कृपया असं म्हणू नका. आज लता दीदींच्या जयंती दिनी हेच गाणं आठवूया.
प्रास्ताविक
हे गीत आहे कविवर्य बा.भ. बोरकरांनी लिहिलेलं आणि सलील कुलकर्णी
यांनी संगीतबद्ध केलेल. शब्द आधी बघू आणि मग गाणं ऐकू.
आता विसाव्याचे क्षण
आता विसाव्याचे क्षण माझे
सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत, त्याची
ओढतो स्मरणी
काय सांगावे नवल,दूर
रानीची पाखरे
ओल्या अंगणी नाचता होती
माझीच नातरे
कधी होती डोळे ओले,मन
माणसाची तळी
माझे पैलातले हंस डोल
घेती त्याच्या जळी
कशी पांगल्या प्रेयसी जुन्या
विझवून चुली
आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली
मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे
दूर असाल तिथे हो नांदतो
मी तुम्हांसवें.
आठवणीतील
गाणी या वेबसाइटवर हे गाणं पूर्ण वाचायला मिळालं. पण त्याच बरोबर संगीत दिग्दर्शक यांनी
गीताबद्दल लिहिलेला सुंदर ब्लॉग.सलील कुलकर्णी म्हणतात “माझ्या या रचनेला दीदींचा स्वर मिळाला ही भाग्याची गोष्ट.” एक वृद्ध जोडपं आपल्या
आयुष्यातील सुखाच्या, दुखा:च्या क्षणाची आठवण काढत आहेत.मला असं वाटतं या गीतातून “आता
विसाव्याचे क्षण” म्हणजेच चिरनिद्रा घेण्याची वेळ समीप येत आहे.
आजी आजोबा बोलत बसले आहेत आणि
नातवंडाची आठवण येणार नाही हे कसं होईल. म्हणून बोरकर लिहितात “काय सांगावे नवल,दूर रानीची पाखरे, ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे. या वयामद्धे आलेला हळवेपणा त्यांच्या
या गीतातील प्रत्येक ओळीत,ठायी ठायी भरलेला आढळतो.
सलील कुलकर्णी यांनी म्हटलंय की त्यांना
या गीतातील “आता” हा शब्द खूप भावला. खरं आहे हे, या “आता”नेच मला भारावून टाकलं. बाकी
गीत काय आहे. हे तेव्हा तरी समजून घ्यायची आणि ऐकायची इच्छा तेव्हा झाली नव्हती. आता
तुम्ही ऐका आणि तुमचे कमेन्ट अवश्य येऊ द्या.
लता दीदी तुम्हाला श्रद्धांजली नाही, हा शब्द नाही लिहिता येणार, शब्दसुमनांजली, आदरांजली वाहतो. अशाच तुमच्या स्वरांच्या रूपाने आमच्यात वर्षानुवर्षे वास्तव्य करावं.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,पुणे
खूप सुंदर लिहीले आहे.हे गाणं ऐकले कीं मन हळवं होते.
ReplyDeleteआदरांजलि😢🌺🌺
ReplyDeleteSuperb blog
ReplyDelete