Blog No. 2023/98
Date: 21st, April 2023.
आज अक्षय्यतृतीया
आहे.अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.साडेतीन मुहूर्त असे दिवस
असतात की ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे
असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही.असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना
उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही
म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.
माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने
जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना
मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे
चारोधाम यात्रा करून पुण्य मिळवायला पहातात.गंगेत जाऊन स्नान केल्याने सर्व पापे धुतली
गेली असे म्हणतात.अरे इतकी भीती वाटते ना मग पाप कर्म करू नका ना.
हे सर्व
बघितले की मला आठवतो तो संत चोखोबा यांचा अभंग, जो पंडित जितेंद्र अभिक्षेकी यांनी
गायला. तुमच्या पैकी अनेकांनी हा अभंग ऐकला असेल कारण आकाशवाणीवर भक्ति संगीतात हा
अभंग हमखास ऐकायला मिळायचा.संत चोखोबा म्हणतात “आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन.” मला पुराण कळत नाही आणि वेदातील वचने देखिल
कळत नाहीत. ते जरी असे म्हणत असले तरी माझ्या मते त्यांना आपल्या पेक्षा जास्त ज्ञान
होते. चोखोबा म्हणतात “आगमाची आढी
निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा” चोखोबा म्हणतात आगम हे अध्यात्मातील तत्वज्ञान
आहे,ज्याचे शैव पंथी आचरण करीत असतात आणि निगम म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे वैष्णव
पंथी आचरण करतात. म्हणजेच शैव परंपरेतील आगमाची आढी आणि वैष्णव परंपरेतील निगमाचा भेद काय हे मला माहिती नाही,तसेच शास्त्रात काय आहे
हे देखिल मला माहित नाही.
पुढे चोखोबा
म्हणतात, “योग,याग,तप, अष्टांग साधन, न कळेची
दान व्रत तप” अर्थात मला योग विद्या काय आहे
ते माहिती नाही, याग म्हणजे यज्ञ काय ते माहित नाही,तो कां केला जातो,त्याचे महत्व
काय हे मला काहीच माहित नाही. तप म्हणजे तपश्चर्या म्हणजे काय? ती कशासाठी करावी लागते
हे मला माहित नाही. तसेच मोक्षप्राप्ती साठी करावी लागणारी आठ प्रकारची योग साधने कोणती
ती देखिल मला माहित नाहीत. दानाचे आणि व्रताचे महत्व देखिल मी जाणत नाही. असे चोखोबा
म्हणतात.
शेवटी चोखोबा
म्हणतात “चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा,गाईन
केशवा नाम तुझे.” चोखोबांचे हे विचार मला भावतात.
ते म्हणतात की हे परमेश्वरा,देवा विठ्ठला माझा भोळा भाव आहे आणि असं म्हणतात की तू
तर भावाचा भुकेला आहेस.मग मी कशाला दुसरे काही करू मला त्याची गरज वाटत नाही. मी तुझे
नाम गात राहीन. वारकरी संप्रदायात नामाचे महत्व अनन्य साधारण आहे.
तुम्हाला
वर लिहिलेले म्हणजेच वेद,योग,याग,तप, अष्टांग साधन,दान, व्रत, तप, आगम आणि निगम काही
देखिल माहित नसले तरी तुमचा परमेश्वर चरणी भाव आहे, श्रद्धा आहे तर त्याच्या नुसत्या
नामाचे गायन केले तरी पुरेसे आहे.असाच या अभंगाचा मतीतार्थ आहे.या सर्व गोष्टी करायच्या
असतील तर खुशाल करा पण त्यात देखिल भावभक्तीने करण्याची गरज आहे. केवळ उपचार म्हणून
नको असे मला वाटते.तुम्हाला काय वाटत ते ह्या ब्लॉग मधे दिलेल्या कमेन्ट बॉक्स मध्ये
लिहा. आणि हो लिहितांना आपले नांव शेवटी जरूर लिहा.

ब्लॉक बिल्कुल योग्य वाटला, भक्ति ने घेतलेले नाम हेच तारक अस्ते
ReplyDeleteअनिल वेगिनवार
ReplyDeleteरामकृष्ण हरि🙏🌺🌺
ReplyDeleteI agree
ReplyDeleteजय राम कृष्ण हरी.
ReplyDeleteखूप छान. सोप्या आणि कमीत कमी शब्दात खूप काही सांगितले आहे.
ReplyDelete- पराग जोगळेकर