Skip to main content

Select your Language

केवळ व्यायामाने प्रीडायबेटिस (Pre-Diabetes) पूर्ववत होऊ शकतो का?

 ब्लॉग नं. 2026/232.  

दिनांक: 20 ऑगस्ट, 2026. 

मित्रांनो,

आजच्या काळात बदलती जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे,जगभरात मधुमेहाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.'लॅन्सेट डायबेटिस अँड एंडोक्राइनोलॉजी' (Lancet Diabetes & Endocrinology) मध्ये प्रकाशित झालेल्या ICMR-INDIAB च्या राष्ट्रीय अभ्यासानुसार,15.3 % भारतीय प्रौढांना प्रीडायबेटिस (Pre-diabetes) आहे.याचा सोप्या शब्दांत अर्थ असा की,देशातील तब्बल 13.6 कोटी लोक टाईप-2 मधुमेहाच्या उंबरठ्यावर उभे आहेत ! अशा वेळी लाखो लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो: "केवळ व्यायामाने प्रीडायबेटिस पूर्णपणे पूर्ववत (Reverse) होऊ शकतो का?" चला, या प्रश्नाचे उत्तर, त्यामागील विज्ञान आणि तज्ज्ञांचे मत सविस्तर समजून घेऊया, आजच्या ब्लॉगमध्ये.   

सविस्तर:
1.प्रीडायबेटिस (Pre-diabetes) म्हणजे नक्की काय?

फोर्टिस नोएडाचे वरिष्ठ सल्लागार (एंडोक्राइनोलॉजी) डॉ. राकेश कुमार प्रसाद सांगतात,"प्रीडायबेटिस ही अशी स्थिती आहे,ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी (Fast Glucose) सामान्यपेक्षा जास्त (5.7% ते 6.4%) असते, पण तिला थेट टाईप-2 मधुमेह म्हणून घोषित करता येत नाही." ही शरीराने दिलेली एक प्रकारची 'रेड अलर्ट' चेतावणी असते.जीवनशैलीत वेळीच योग्य बदल केले नाहीत,तर प्रीडायबेटिस असलेल्या 60% लोकांना पुढील काही वर्षांत टाईप-2 मधुमेह होण्याची दाट शक्यता असते.यामुळे हृदयविकार,पक्षाघात (Stroke),किडनी खराब होणे,मज्जातंतूंचे नुकसान आणि फॅटी लिव्हर यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

2.केवळ व्यायाम प्रीडायबेटिस पूर्ववत करू शकतो का?

होय,अनेक लोकांसाठी याचे उत्तर 'होय' असेच आहे! विशेषतः जेव्हा या स्थितीचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात होते.डॉ.राकेश कुमार प्रसाद यांच्या मते,"नियमित शारीरिक हालचालींमुळे शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity) वाढते,ज्यामुळे स्नायूंना ग्लुकोज अधिक प्रभावीपणे शोषून घेता येते." आश्चर्यकारक बाब म्हणजे,वजन कमी होण्याआधीच अवघ्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत व्यायामाचे हे फायदे दिसू लागतात.

व्यायामाचे शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम:

स्नायू ग्लुकोज शोषून घेतात: व्यायाम करताना आणि नंतर आपल्या शरीरातील स्नायू (Skeletal Muscles) रक्तातील साखरेचा वापर इंधन म्हणून करतात.

पोटाची चरबी (Visceral Fat) कमी होते: संशोधनानुसार व्यायामामुळे इन्सुलिनच्या प्रतिकाराला कारणीभूत ठरणारी पोटावरील अंतर्गत चरबी कमी होते.

वजन नियंत्रण: शरीराचे 5% ते 10% वजन कमी केल्याने,रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात प्रचंड सुधारणा होते.

3.प्रीडायबेटिस पूर्ववत करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम कोणते?

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराचे चयापचय (Metabolism) सुधारण्यासाठी खालील व्यायामांचा समावेश करावा:

चालणे (Fast Walking): दररोज वेगाने चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. चढणीवर चालणे किंवा गती बदलून चालल्याने अधिक कॅलरीज बर्न होतात.

एरोबिक व्यायाम (Aerobics): सायकल चालवणे, जॉगिंग करणे आणि पोहणे यांमुळे पेशी इन्सुलिनला अधिक चांगला प्रतिसाद देतात.

स्ट्रेंथ ट्रेनिंग (Weight & Resistance Training): स्क्वॅट्स, लंग्स, वेट लिफ्टिंग किंवा रेझिस्टन्स बँडचा वापर. स्नायू हे ग्लुकोज साठवण्याचे सर्वात मोठे ठिकाण असल्यामुळे आठवड्यातून किमान २ वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

संयोजन प्रशिक्षण (Combination Training): एरोबिक आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या दोन्ही व्यायामांचे एकत्र संयोजन सर्वात जलद व सर्वोत्तम परिणाम देते.

4.दररोज किती आणि कसा व्यायाम करावा?

वेळेचे गणित: आठवड्यातून किंवा 5 दिवस किमान 150 मिनिटे,मध्यम स्वरूपाचा एरोबिक व्यायाम (दररोज 30 मिनिटे चालणे) आवश्यक आहे.अधिक चांगल्या फायद्यांसाठी हा वेळ,आठवड्याला 300 मिनिटांपर्यंत वाढवता येतो.

सातत्य महत्त्वाचे: फक्त वीकेंडला (शनिवार-रविवार) व्यायाम करण्यापेक्षा,दररोज सातत्याने व्यायाम करणे अधिक फायदेशीर ठरते.

जेवणानंतर 10-15 मिनिटे चाला: जेवण झाल्यावर त्वरित 10 ते 15 मिनिटे शतपावली केल्यास रक्तातील साखरेची अचानक होणारी वाढ रोखता येते.

5.केवळ व्यायाम सर्वांसाठी पुरेसा आहे का? (व्यायाम विरुद्ध आहार)

नाही,केवळ व्यायाम प्रत्येकासाठी पुरेसा ठरेलच असे नाही.अनुवांशिकता,लठ्ठपणा आणि बैठी जीवनशैली,या घटकांमुळे प्रत्येकावर व्यायामाचा परिणाम वेगवेगळा असू शकतो.डॉ. प्रसाद स्पष्ट करतात, "आहार आणि व्यायाम हे एकमेकांच्या विरोधात नसून पूरक आहेत. निरोगी आहारामुळे वजन लवकर कमी होते, परंतु केवळ आहारामुळे स्नायू आणि हाडांची ताकद कमी होऊ शकते. दुसरीकडे, व्यायामामुळे स्नायू टिकून राहतात आणि इन्सुलिन संवेदनशीलता थेट सुधारते. म्हणूनच समतोल आहार आणि नियमित व्यायाम या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यास प्रीडायबेटिस बरा होण्याची शक्यता सर्वाधिक असते."

6.तुमचा प्रीडायबेटिस सुधारत असल्याची चिन्हे कशी ओळखावीत?

जर तुम्ही नियमित प्रयत्न करत असाल,तर साधारण 3 महिन्यांच्या कालावधीत खालील सकारात्मक बदल दिसून येतात:

उपाशी पोटी (Fasting) रक्तातील साखरेची पातळी कमी होणे.

HbA1c च्या पातळीत घट होणे.

कंबरेचा घेर कमी होणे आणि वजन नियंत्रणात येणे.

दिवसभरात ऊर्जेची (Energy Level) पातळी वाढल्याचे जाणवणे.

समारोप:

            यासाठी महत्वाचे काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील, जसे की, रात्री 7 ते 9 तासांची गाढ झोप घ्या;अपुऱ्या झोपेचा रक्तातील साखरेवर वाईट परिणाम होतो. एकाच जागी बराच वेळ बसून राहणे टाळा.कोणताही नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी किंवा आहारात मोठा बदल करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा (डॉक्टरांचा) सल्ला निश्चित घ्या. योग्य तीव्रता, सातत्य आणि योग्य आहाराची जोड दिल्यास व्यायामाच्या बळावर प्रीडायबेटिस नक्कीच पूर्ववत (Reverse) केला जाऊ शकतो आणि टाईप-२ मधुमेहाचा धोका कायमचा टाळता येऊ शकतो !

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

होलीस्टीक हेल्थ कोच

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...