दिनांक: 24 मे, 2026.
मित्रांनो,
काही दिवसांपासून,भारतीय रुपयाच्या (INR) घसरत्या मूल्याबाबत,सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत,रुपया विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे,चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पण हा प्रश्न केवळ भारतापुरताच मर्यादित आहे का? की जागतिक अर्थकारणाचा हा एक भाग आहे? हे समजून घेण्यासाठी, आपण 2012 मधील आणि आजच्या (2026 मधील),प्रमुख जागतिक चलनांच्या विनिमय दरांचा (Exchange Rates),आजच्या ब्लॉगमध्ये एक तुलनात्मक अभ्यास करूया आणि रुपयावर पडलेल्या ताणाची वास्तविक कारणे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
सविस्तर:
गेल्या तीन चार महिन्यांपासून चाललेल्या आखातातील संघर्षाचा,परिणाम म्हणादुष्परिणाम म्हणा, केवळ भारतावर नाही तर जागतिक अर्थकारणावर याचा परिणाम झाला आहे.अर्थशास्त्रात इतर परिस्थिति समान असतांना,असं गृहीत धरून सिद्धांत मांडले गेले आहेत,जी परिस्थिति कधी समान असू शकत नाही.आणि आता ती फारच बिघडलेली आहे,ज्यात विकसित राष्ट्रांची सुद्धा चांगली स्थिती नाही,तिथे भारतासारख्या विकसनशील आणि अफाट लोकसंख्या असलेल्या राष्ट्राबाबत काय बोलावे.खाली डॉलरच्या तुलनेत इतर चलनांची काय स्थिती आहे, याचे स्पष्ट चित्र मांडत आहे.
जागतिक चलनांची डॉलरसमोरील स्थिती: 2012 विरुद्ध 2026:
खालील तक्त्यामध्ये 1 अमेरिकन डॉलर (USD) च्या तुलनेत,इतर मुख्य चलनांचे 2012 मधील सरासरी मूल्य आणि आजचे थेट मूल्य दिले आहे.एक डॉलर विकत घेण्यासाठी 2012 मध्ये रु.53.30 इतके द्यावे लागत असतं. अशाच प्रकारे ब्रिटिश पौंड 0.64 मध्ये एक डॉलर मिळत असे. या प्रमाणे:_
|
Sr No. |
Currency |
Short Name |
Rate in 2012 |
Rate in 2026 |
% Decline |
|
1 |
भारतीय रुपया |
INR |
53.30 |
96.86 |
81.70 |
|
2 |
ब्रिटिश पाउंड |
GBP |
0.64 |
0.75 |
17.20 |
|
3 |
युरो |
EUR |
0.77 |
0.86 |
11.70 |
|
4 |
जपानी येन |
JPY |
76.93 |
159.02 |
106.70 |
|
5 |
ऑस्ट्रेलियन डॉलर |
AUD |
0.98 |
1.40 |
42.80 |
|
6 |
सिंगापूर डॉलर |
SGD |
1.30 |
1.28 |
-1.5 |
|
7 |
कॅनेडियन डॉलर |
CAD |
1.02 |
1.38 |
35.30 |
आकडेवारीचे सखोल विश्लेषण आणि निष्कर्ष:
या आकडेवारीकडे बारकाईने
पाहिल्यास,काही अत्यंत महत्त्वाचे आर्थिक प्रवाह,आपल्या लक्षात येतात:
1.रुपयाची घसरण आणि त्याचे मूळ:
2012 मध्ये 1 डॉलरसाठी सुमारे 53 रुपये मोजावे लागत होते, ते आज तब्बल 96.86 रुपयांवर पोहोचले आहेत.गेल्या 14 वर्षांत रुपयात
जवळपास 81.70% घसरण झाली आहे. भारताची वाढती आयात (विशेषतः
कच्चे तेल), व्यापारी तूट आणि अमेरिकेतील वाढलेले व्याजदर
यामुळे डॉलर मजबूत झाला असून रुपयावर दबाव आला आहे.
2.जपानच्या 'येन'ची ऐतिहासिक घसरण: अनेकांना वाटेल की फक्त रुपयाच घसरतो आहे,पण वास्तवात जपानच्या चलनाची (JPY) अवस्था सर्वात वाईट आहे.2012 मध्ये मजबूत असणारा येन,आज डॉलरच्या तुलनेत 106% पेक्षा जास्त घसरला आहे (76 वरून 159).जपानच्या केंद्रीय बँकेचे दीर्घकालीन शिथिल व्याजदर धोरण याला कारणीभूत आहे.
3. युरोप आणि विकसित देशांची स्थिती: ब्रिटिश पाउंड (17.2 %) आणि युरो (11.7 %) हे देखील डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाले आहेत.ऑस्ट्रेलियन डॉलर (42.8%) आणि कॅनेडियन डॉलर (35.3%) या कमोडिटी-आधारित चलनांमध्येही मोठी घसरण झाली आहे. यावरून स्पष्ट होते की, डॉलर जागतिक स्तरावर इतर सर्व चलनांना मागे टाकत आहे. महत्वाचं म्हंजे ही सगळी विकसित राष्ट्रे आहेत.
4. सिंगापूरचा अपवाद: या संपूर्ण यादीत केवळ सिंगापूर डॉलर (SGD) असा आहे, ज्याने स्वतःचे मूल्य टिकवून ठेवले आहे आणि त्यात किरकोळ 1.5% ची मजबुती दिसली आहे. सिंगापूरचे मजबूत आर्थिक धोरण आणि परकीय गुंतवणूक याला कारणीभूत आहे.
भारताच्या एकूण आयात खर्चात (Import Bill) खालील तीन प्रमुख वस्तूंचा वाटा खूप मोठा असल्याने,देशाच्या आर्थिक धोरणात यांच्यावरील खर्चाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.याबद्दल सविस्तर बघू या.
नुकत्याच संपलेल्या चालू आर्थिक वर्षातील,(FY 2025–26) अधिकृत व्यापारी आकडेवारीनुसार, भारताचा या वस्तूंवरील वार्षिक खर्च,खालीलप्रमाणे आहे:
1. कच्चे तेल (Crude ऑइल): कच्च्या तेलाची आयातीचा खर्च ,$ 134.70अब्ज डॉलर्स इतका होतो,जो आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी,तब्बल 89 % तेल आपण आयात करतो.याचा मोठा हिस्सा पश्चिम आशियाई देशांतून येत असल्याने, जागतिक घडामोडींमुळे होणाऱ्या दरवाढीचा थेट परिणाम भारतावर होतो.हा खर्च एकूण आयातीच्या 17.4% आहे.
2. सोने आयातीसाठीचा खर्च: सोने आयातीचा खर्च,$ 72.0 अब्ज डॉलर्स इतका आहे आणि तो एकूण आयातीच्या 9.3% इतका आहे.
3. तर खतांच्या आयातीसाठी: खतांच्या आयातीसाठी खर्च, $ 14.5 अब्ज डॉलर्स म्हणजे एकूण आयातीच्या 1.9% इतका आहे.या वस्तू खरेदी करण्यासाठी,भारताला मोठ्या प्रमाणात,अमेरिकन डॉलर्स मोजावे लागतात.
2012 च्या तुलनेत खर्च वाढण्याची कारणे:
1. 2012 च्या तुलनेत पेट्रोल आणि डीजल वाहनांची संख्या बघितल्यास, 2012 मध्ये, पेट्रोल आणि डीजल वाहनांची संख्या 15.60 करोड एवढी होती,ती आता 2026 मध्ये 36 करोड एवढी म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. साहजिकच इंधनाची मागणी वाढली आहे.
2. तेच LPG कनेक्शनच्या बाबत म्हणता येईल,2012 मध्ये LPG कनेक्शन 14.00 कोटी एवढे होते, ते आता 2026 मध्ये 33.2 कोटी झाले आहेत.
3. याच प्रमाणे पाइप लाइन गॅस म्हणजे PNG चे कनेक्शन जे 2012 मध्ये 20.00 लाख होते (जे प्रामुख्याने मोठ्या शहरात होते.) ते 2026 मध्ये 1.67 कोटी म्हणजे आठ पट वाढले आहे.
4. CNG वाहनांची संख्या जी 2012 मध्ये 18 लाख इतकी होती,ती 2026 मध्ये 75 लाख इतकी झाली आहे. याचा ताण रुपयांवर पडला आहे. हा गॅस कतार आणि अमेरिकेकडून डॉलरमध्येच विकत घ्यावा लागतो.यामुळे देशाच्या व्यापारी तुटीवर (Trade Deficit) प्रचंड ताण पडतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाच्या मूल्यावर याचा थेट परिणाम होतो. वरील लाल रंगातील आकडे रुपयावरील ताण वाढल्याचे दर्शवितात,तसेच ते 2012 ते 2026 या काळांत झालेली प्रगती देखिल दर्शवितात. हे महत्वाचे.
याच आर्थिक भारामुळे,सरकारने नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे, सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याचे आणि सोन्याची बिगर-अत्यावश्यक खरेदी पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे,जेणेकरून परकीय चलनाची बचत करता येईल.आणि रुपया स्थिरवण्यास मदत होईल .
समारोप:
रुपयाचे अवमूल्यन ही केवळ भारतांतर्गत समस्या नसून, तो एका जागतिक आर्थिक चक्राचा भाग आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची धोरणे आणि जागतिक भू-राजकीय घडामोडींमुळे डॉलर हा इतर सर्व चलनांच्या तुलनेत महाशक्ती बनला आहे. रुपयाची घसरण चिंताजनक असली, तरी जपानी येन किंवा ऑस्ट्रेलियन डॉलरच्या तुलनेत भारताने आपली स्थिती बऱ्याच अंशी नियंत्रित ठेवली आहे. ही घसरण रोखण्यासाठी आपल्याला आयातीवरील अवलंबित्व कमी करून,निर्यात वाढवण्यावर अधिक भर द्यावा लागेल.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.

ब्लॉगमध्ये जी माहिती दिली आहे त्याला अनुसरून ठीक आहे
ReplyDeleteपरंतु हा विषय ब्लॉग मध्ये चर्चा करता येणार नाही. कारण याचे खूप वेगवेगळे आयाम आहेत.
बरं, हे आयाम वेगवेगळ्या भागांमध्ये पण चर्चा करून काही साध्य होणार नाही. भावर व्यवस्थित चर्चा होण्यासाठी ते एकाच भागात करणे गरजेचे आहे. ब्लॉगमध्ये ते शक्य नाही म्हणून जास्त लिहीत नाही