Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

कृत्रिम गोडवा असलेल्या शीतपेयांचे नियमित सेवन धोकादायक

ब्लॉग नं:2025/366.

दिनांक:30 डिसेंबर,2025. 

मित्रांनो,

आजच्या धकाधकीच्या जीवनात “साखर टाळा” हा सल्ला सर्वत्र ऐकू येतो.वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, मधुमेह टाळण्यासाठी किंवा “हेल्दी” पर्याय म्हणून,अनेक जण डाएट कोक, पेप्सी मॅक्स, झिरो कॅलरी शीतपेय आणि शुगर-फ्री च्युइंगम यांचा आधार घेतात. पण या गोड चवीमागे लपलेला धोका आपण पुरेसा लक्षात घेतो का? या विषयावर सविस्तर जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये.

सविस्तर:

अलीकडेच समोर आलेल्या एका संशोधनाने या प्रश्नाला गंभीर वळण दिले आहे. एस्पार्टेम म्हणजे नेमके काय? एस्पार्टेम हा एक कृत्रिम गोड पदार्थ असून,तो साखरेपेक्षा सुमारे 200 पट अधिक गोड असतो. त्यामुळे कमी प्रमाणात वापरूनही पदार्थ गोड लागतो. म्हणूनच तो डाएट शीतपेयांमध्ये, शुगर-फ्री गम, लो-कॅलरी मिठाई आणि औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

नवीन संशोधन काय सांगते? स्पेनमधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात उंदरांवर एस्पार्टेमच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला.हा अभ्यास ‘Biomedicine and Pharmacotherapy’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

या संशोधनातील काही चिंताजनक निष्कर्ष असे:

एस्पार्टेमचे नियमित सेवन केल्यास, हृदयाचे स्नायू जाड होण्याचा (कार्डियाक हायपरट्रॉफी) धोका सुमारे २०% वाढतो,हृदयाची कार्यक्षमता कमी होते,हृदयाच्या डाव्या कप्याचे आउटपुट 26% घटले, हृदयाच्या उजव्या कप्याचे आउटपुट २०% घटले, मेंदूशी संबंधित संज्ञानात्मक क्षमतेत (memory, thinking) वेगाने घट,मेंदूत संभाव्य पॅथोफिजियोलॉजिकल बदल, शरीरातील चरबी सुमारे २०% कमी झाली, पण त्याची किंमत हृदय आणि मेंदूने मोजली.संशोधक स्पष्टपणे सांगतात, वजन कमी होणे हा एकमेव निकष मानला, तर आपण शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर होणारे गंभीर परिणाम दुर्लक्षित करतो.”

हा डोस माणसांसाठी किती धोकादायक?

या अभ्यासात उंदरांना शरीराच्या वजनाच्या प्रति किलो 7 मिलीग्राम एस्पार्टेम देण्यात आले.
तर WHO, FDA आणि युरोपियन एजन्सी सांगतात की माणसांनी दररोज
50 मिलीग्राम/किलोपेक्षा जास्त सेवन करू नये. म्हणजेच परवानगी असलेल्या मर्यादेतही दीर्घकाळ सेवन केल्यास धोका संभवतो, असा संशोधकांचा इशारा आहे.

विरोधी मत काय सांगतं?

इंटरनॅशनल स्वीटनर्स असोसिएशन (ISA) या संस्थेने मात्र या निष्कर्षांबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.त्यांचे म्हणणे असे आहे की,उंदीर आणि माणूस यांच्यातील चयापचय, आयुष्य, हृदय व मेंदूची रचना वेगळी आहे, उंदरांमध्ये दिसलेले बदल मानवी शरीरावर थेट लागू करता येणार नाहीत,मानवी अभ्यासांनुसार एस्पार्टेम वजन कमी करत नाही, पण साखरेऐवजी वापरल्यास एकूण कॅलरी कमी होऊ शकतात आणि वृद्ध उंदरांमध्ये हे बदल नैसर्गिक वृद्धत्वामुळेही असू शकतात

कर्करोगाचा मुद्दा:

2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने एस्पार्टेमला, मानवांसाठी संभाव्य कर्करोगजन्य” (Possibly carcinogenic) म्हणून वर्गीकृत केले.तथापि, त्यांनी हेही स्पष्ट केले की, हा धोका खूप जास्त प्रमाणात सेवन केल्यावरच लागू होतो. 70 किलो वजनाची व्यक्ती दिवसाला सुमारे 14 कॅन डाएट शीतपेय सुरक्षितपणे पिऊ शकते (तांत्रिकदृष्ट्या). पण प्रश्न असा आहे सुरक्षित मर्यादा” म्हणजे खरंच “निरुपद्रवी” का?

मग आपण काय करावे?

✔️ कृत्रिम गोडव्यावर संपूर्ण अवलंबित्व टाळा,

✔️ नैसर्गिक गोड पदार्थ मर्यादेत वापरा (गूळ, मध),

✔️ पाण्याची, ताकाची, लिंबूपाण्याची सवय लावा,

✔️ वजन कमी करण्यासाठी “शॉर्टकट” न शोधता जीवनशैली बदला,

✔️ विशेषतः वृद्ध, हृदयरोगी आणि मेंदूशी संबंधित तक्रारी असलेल्यांनी अधिक सावध राहावे

समारोप:

एस्पार्टेम गोड आहे, पण त्याचे परिणाम तितके गोड नसू शकतात. वजन कमी होणे हे आरोग्याचे एकमेव मोजमाप नाही. हृदय, मेंदू आणि दीर्घकालीन आरोग्य यांची किंमत मोजून मिळणारे वजन नियंत्रण खरोखर फायदेशीर आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कमी साखर” हा चांगला विचार आहे, पण त्याला “कृत्रिम गोडवा ” हा नेहमीच चांगला पर्याय असेलच, असे नाही.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Post a Comment