Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती - वाचन प्रेरणा दिवस

 Blog No.2023/262            

Date:- 15th,October 2023.


मित्रांनो,

            आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आझाद यांची जयंती.त्यांना आपण भारताचे राष्ट्रपती म्हणून ओळखतोच,पण त्यांची ओळख ही आपल्याला ते राष्ट्रपती होण्यापूर्वी होती.त्यांना आपण भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखत असू. कारण आंतरखंडीय मिसाईलचा विकास करण्यात आणि भारताचा अंतराळ कार्यक्रम पुढे नेण्यात त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे.पण या सोबतच त्यांचा वाढदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून ओळखला जातो.त्या विषयी आज सांगणार आहे. 

प्रास्ताविक

            पुस्तके ही मनुष्याची खरी मित्र असतात.आपल्याला मिळणारे प्रारंभीक ज्ञान हे पुस्तकातून मिळत असतं.जे प्रामुख्याने शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तकातून मिळतं.पण तेवढ्याने भागणार नाही. कथासंग्रह, काव्यसंग्रह आणि कादंबरी तुमचं मनोरंजन करतात.पण वैचारिक पुस्तके तुमची वैचारिक भूक भागवतात. आजकाल पुसकांची जास्त गरज भासू लागलीय,कारण पूर्वी म्हणजे माझी पिढी लहान किंवा तरुण असतांना रविवारी किंवा सुटीच्या दिवशी इतरांकडे जाणे असायचे.त्यावेळी होणाऱ्या गप्पांमधून बरीच माहिती किंवा वेगवेगळ्या विषयावरचे ज्ञान मिळत असे.आजकाल एकमेकांकडे बसायला जाण्याचा अर्थ बदलला आहे.ते वेगळ्या अर्थाचे बसणे,यात मुले आणि स्त्रियांना सहभाग घेता येत नाही किंवा निषिद्ध असतो.

            वाचनातून केवळ करमणूक किंवा विविध विषयांचे ज्ञान मिळते असे नव्हे,तर संस्कृतीचे जतन आणि विकास होत असतो.आपल्या धार्मिक ग्रंथांचा परदेशातील लोक अभ्यास करतात.वाचन हे सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहित करत असते.अनेक लेखक, साहित्यिक किंवा मोठ्या व्यक्तींच्या साहित्यातून त्यांचे अनुभव वाचून बऱ्याच वेळेस कठीण प्रसंगातून वाट कशी काढता येईल,याचे मार्गदर्शन मिळु शकते.वाचन हे चिंता,ताण, तणाव, नैराश्य हा मानसिक समस्यांवर तोडगा काढता येतो.एक पुस्तक हे 100 मित्रांच्या बरोबरीचे असते असे डॉ.कलाम सर म्हणतं असतं.     

वाचन प्रेरणा दिवस कसा साजरा केला जातो

            या दिवशी शाळा आणि महाविद्यालयातून वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजत केले जातात. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या वाचनालयात अधिक पुस्तके खरेदी करून वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. वाचन चळवळ वाढण्यासाठी काय करता येईल? किंवा वाचन चळवळ वाढण्यासाठीचे उपाय इत्यादि विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

            एक सुरेख,सुरेल आणि गोड गाण्याची निर्मिती एक सामूहिक कार्य आहे.गीतकार आपले शब्द गुंफून एक सुंदर रचना संगीतकाराच्या हाती सोपवितो.तो त्या गीतातील शब्दांना सुरात बांधतो आणि एका योग्य गोड आवाजाच्या गायकाचे स्वर त्या कवीच्या गोड शब्दांना आणि सुरेल सुरांना एक वेगळीच अनुभूति प्राप्त करून देतात.तद्वत एक लेखक हा सुंदर साहित्य निर्मिती करतो.पण ते साहित्य किंवा ती साहित्य निर्मिती वाचनीय बनविण्यात एक मुखपृष्ठकार,एक संपादक,एक मुद्रक यांचं खूप मोठं योगदान आहे.हे सारेच वाचन चळवळ वाढविण्यास एक प्रकारे मदत करत असतात.   

            आजकाल आपण म्हणतो की वाचनाची आवड कमी झाली आहे.पण घरांमधील जागेची कमतरता म्हणजेच बीएचके या घरांच्या संकल्पनेमुळे पुस्तके विकत घेतली तरी ठेवायची कुठे ही समस्या निर्माण झाली आहे.ई-बूकची निर्मिती आणि विक्री हे या समस्येला सापडलेले उत्तर आहे.आधी ई-बूक नव्हती,पण पुस्तक विकत घेऊन घरी न ठेवता देखिल घरी आणून वाचायची सोय वाचनालयाच्या स्वरूपात उपलब्ध होती. पण आजकाल लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली आहे,शहरांचा आकार वाढला आहे,त्या प्रमाणात वाचनालये वाढली नाहीत.पण Amazon च्या किन्डल बुक्सनी काही प्रमाणात वाचनालयाला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.यासाठी तुम्हाला आधी आपल्या स्मार्ट फोनवर Amazon app डाउनलोड करावं लागतं.त्या नंतर तुम्हाला किन्डल अनलिमिटेडचे सभासद व्हावं लागतं.ज्याचे शुल्क रु.169 प्रति माह आहे.या शुल्कात तुम्ही शून्य रुपयात उपलब्ध असणारी अनलिमिटेड पुस्तकं वाचू शकता.किंवा ई-बूक माफक दरात उपलब्ध आहेत.ती विकत घेऊन तुम्ही आपल्या स्मार्ट फोनवर वाचू शकता.माझी दहा पुस्तके (8 कथासंग्रह आणि 2 कादंबऱ्या) किन्डल अनलिमिटेडच्या सभासदांसाठी मोफत आणि इतरांसाठी अतिशय माफक दरात (रु.50/- ते रु.100/- प्रति पुस्तक) किन्डलवर मी उपलब्ध करून दिली आहेत. हा मी वाचन चळवळ संवर्धन आणि विकासात माझा सहभाग समजतो. 

समारोप

           “वाचाल तर वाचाल” हे सुभाषित,वाचन चळवळ वाढविण्यासाठी वापरलं जायचं,ते आज देखिल ते लागू आहे.वाचन चळवळ वाढीसाठी आजही बरेच लोक आणि समाजसेवी संस्था बरेच काही करत आहेत.नासिकहून मुंबई आग्रा रोडने ओझरला जातांना 10 मैलावर किंवा 16 किमी वर एक पुस्तकांचे हॉटेल आहे. एक 73 वर्षीय भीमाताई जोंधळे यांचे Hotel Relax Corner हे हॉटेल आहे जे खाण्याच्या पदार्थाइतकेच किंबहूना अधिकच पुस्तकांचे हॉटेल म्हणून प्रसिद्ध झाले आहे.यावर एक सविस्तर ब्लॉग मी घेऊन येत आहे. पण आज “वाचन प्रेरणा दिना”चे औचित्य साधत,हॉटेल तर्फे रु.50,000/- च्या पुस्तकांचे मोफत वाटप होणार आहे.आज जो  कुणी हॉटेलला भेट देईल त्याला पुस्तक मोफत दिले जाईल.अल्प शिक्षण झालेल्या श्रीमती भीमाताई जोंधळे आणि त्यांना या कार्यात सर्वतोपरी मदत करणारे श्री. प्रवीण जोंधळे आणि त्यांच्या पत्नी यांचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे.”वाचन प्रेरणा दिनानिमित माझ्या सर्वांना शुभेच्छा आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम सरांना माझे विनम्र प्रणाम.       

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

Post a Comment