Blog No. 2023/42
Date: 19th, February 2023.
मित्रांनो,
अगदी परवाची गोष्ट मी बाजारात गेलो होतो.महाशिवरात्र
म्हणून बेल,धोत्रा आणि फुलं घेऊन यावी म्हणून बाहेर पडलो.वेळ सकाळी 10.35 ची,आमचे फॅमिली
डॉक्टर दवाखान्याजवळ आपली गाडी पार्क करीत होते.मी नमस्कार केल्यावर,त्यांनी काय कुठे
निघालात वगैरे विचारल्यावर,मला म्हणाले थोडा वेळ आहे कां?थोडं बोलायचे आहे.मला वाटलं
त्यांना माहित होतं की मी बँकेत होतो.त्यामुळे काही लोन वगैरे बद्दल विचारतील.मी म्हटलं
हो आहे वेळ.तर म्हणाले चला क्लिनिकमधे बसू.आम्ही क्लिनिक मधे जाऊन पोहोचलो.
डॉक्टरांनी
सांगितलेली गोष्ट
क्लिनिकमधे पोहोचल्यावर ते मला म्हणाले “सर,एक माझे पेशंट आहेत.बरेच वर्ष झाले,काही
छोटं मोठं दुखणं झालं की माझ्याकडे येतात.काल माझ्याकडे आले आणि म्हणाले मी जीवनापासून
खूप निराश झालो आहे.तीन मुली,जेमतेम एकीचे लग्न झालं.दोन लग्नाच्या आहेत.कोविड काळांत
माझी नोकरी गेली.गेली म्हणजे फॅक्टरी बंद पडली, मालक
कोविडने गेले.घरी फॅक्टरी चालविण्याचे ज्ञान कुणालाच नाही.proprietary फर्म होती. त्या फर्म मधे 25 वर्षे नोकरी केली.अगदी थोरल्या मालकापासून ते
धाकल्या मालकापर्यंत.आता 55 वय माझं,कोण नोकरी देणार.बायको म्हणाली,निराश होऊ नका.मी
धुणी भांडी करीन.आता सांगा तिनं कधी हे काम केलं नाही.आता 50 व्या वर्षी कुठं जमायला आणि खरं सांगू कां,तिनं काही
करावे ही माझी इच्छा नाही. डॉक्टर साहेब, हे नैराश्य सरणे नाही.एखादी गोळी असेल तर
सांगा ना पटकन जीवन संपून जाईल अशी.मी त्यांना म्हटले मी जीवनदान देणारा डॉक्टर आहे
आणि मीच काय कुणीही डॉक्टर जीवन संपवायला मदत करणार नाही.मानसोपचार तज्ञ तुमच्या नैराश्याला
दूर करु शकतील. सांगा सर आता, असे बरेच पेशंट माझ्या कडे येतात,त्यांना मी सांगतो त्याचा
इलाज माझ्याकडे नाही.तुम्ही ब्लॉग लिहिता,ह्या गंभीर समस्येला तुम्ही वाचा फोडायला
हवी.
मानसिक रोगाबद्दलचे वास्तव
मी सुन्न होऊन घरी परतलो.मी वाचलं होतं की कोविड नंतर
हे प्रमाण खूप वाढलं आहे.पण जेव्हा मी “द लॉजिकल इंडियन” चे आर्टिकल वाचले,तेव्हा मला
समस्येचे गांभीर्य अधिक चांगले कळले.भारतात एकूण 5 करोड 60 लाख एवढे लोक वैफल्याने पछाडले आहेत तर 3 करोड
80 लाख हे चिंताग्रस्त (Anxiety Disorder)
आहेत.भारतात मानसिक रोगी हे 15 करोडच्या आसपास आहेत. भारतात मनोविकारतज्ञ (Psychiatrist) आणि मानसशास्त्रज्ञ
(Psychologist) ह्यांचे मिळून प्रमाण हे दर एक लाखामागे
4 ते 5 एवढे आहे. मानसिक रुग्णांचे प्रमाण हे केरळ,कर्नाटक,तेलंगणा, तामिळनाडू,हिमाचल
प्रदेश,महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,मणीपुर आणि पश्चिम बंगाल मधे अधिक आहे.
मानसिक रोग हा आजार हे समजून घेण्याची गरज
भारतात मानसिक रुग्णाला आजार म्हणून उपचार करण्याची आवश्यकता
असते.ही मानसिकता शिक्षणाचे प्रमाण वाढूनही तयार झाली नाही.असे दुर्दैवाने म्हणावे
लागेल.मानसिक रुग्णास अरे तो वेडा आहे,तो डोक्याने कमी आहे, तो नाटक करतो किंवा गंमतीने मतिमंद आहे असे म्हटले जाते.खरं म्हणजे
मतिमंद असणे हा आजार आहे.तो अधिकतर जन्माच्या वेळेस काही कारणांमुळे होऊ शकतो.
मानसिक आजारांची कारणे
मानसिक आजारांची कारणे पुढील प्रमाणे आहेत.बाळपणातील अत्याचार,आघात किंवा दुर्लक्ष,सामाजिक एकटेपणा किंवा एकाकीपणा,वर्णद्वेष आणि भेदभाव,दारिद्र्य,कर्जबाजारीपणा,जवळच्या
व्यक्तीचे मरण,घटस्फोट,तीव्र किंवा दीर्घकालीन ताण,दीर्घकालीन आजार,बेरोजगारी अथवा
नोकरी सुटणे,घरगुती हिंसाचार, मद्यपान, गुंडगिरी,एखाद्या गंभीर समस्येने ग्रासणे किंवा
एखाद्या हिंसक घटनेत सहभागी होणे. ह्या कारणाने मानसिक आजार होऊ शकतो.ही कारणे आहेतच.पण
ह्यातील काही कारणांमागे जीवघेणी स्पर्धा, वाढत्या गरजा आणि त्यासाठी पुरे न पडणारे
उत्पन्न,आपण इतरांपेक्षा कसे वेगळे किंवा मोठे आहोत हे दाखविण्याचा हव्यास.”अंथरुण
पाहून पाय पसरावे” ह्या उक्तीस दिलेली तिलांजलि, पाश्चात्यांचे अंधानुकरण ह्या गोष्टी
कारणीभूत आहेत, असे मला वाटते.
ह्यावर उपाय
मी मघाशी डॉक्टर साहेबांची जी गोष्ट सांगितली त्यातल्या
त्या माणसाने विचारलेला एक प्रश्न म्हणजे,इतर डॉक्टरचे जसे नेमबोर्ड दिसतात.तसे मी
मनोविकारतज्ञ (Psychiatrist) आणि मानसशास्त्रज्ञ (Psychologist) ह्यांचे नेमबोर्ड
पाहिले नाहीत.हे अगदी खरे आहे. ह्यासाठी मनोविकारतज्ञ (Psychiatrist) आणि मानसशास्त्रज्ञ
(Psychologist) यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे
आवश्यक आहे.त्या सोबतच हे कोर्स करण्यासाठी तरुण मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.कारण
मानसिक आजार झालेल्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 20% एवढी होण्याआधीच काही करणे
आवश्यक आहे. कारण मानसिक रोग्यांमध्ये लहान मुले आणि तरुणांची संख्या अधिक आहे हे चिंतेचे
कारण आहे.
प्रसाद नातु,पुणे.


Nice blog. Thanks for writing on this important topic which is ignored on a whole.
ReplyDelete