Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

महाशिवरात्र

Blog No. 2023/41      

Date: 18th, February 2023. 


मित्रांनो 

            महाशिवरात्र हा एक हिंदू सण आहे.जो देशभर साजरा केला जातो. तसे तर शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात शिवरात्र ही साजरी केली जाते.पण हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी (फेब्रुवारी/मार्च) महिन्यात येणारी शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून साजरी केली जात असते. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले होते असे मानले जाते.     

महाशिवरात्रीच्या पूजेसंबंधी थोडे काही  

            महाशिवरात्रीला पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप,शेण,गोमूत्र आणि दहयाने शिवलिंगाला अभिषेक केला जातो.त्या नंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. भगवान शंकराची पूजा, आराधना केली जाते. ॐ नम: शिवाय ह्या जपाची एक माळ म्हणजे 108 वेळा म्हटलं जातो. त्या सोबत शंकराच्या पिंडीवर 108 बेल पत्र वहाण्याची देखिल परंपरा आहे असे म्हटले जाते. महाशिवरात्रीच्या रात्री देशातील काही भाविक भजन करून त्या नंतर दूधामधे भांग मिसळून त्याचे सेवन करतात. तर काही ठिकाणी दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते दूध पितात.ह्या दुधाला थंडाई असे म्हटले जाते. मी गोंदिया येथे असतांना भजन आणि त्या नंतर थंडाई पिण्याची जी प्रथा आहे ती अनुभवली.


 भारतातील विविध भागात सण साजरा कसा होतो

            आता आपण भारताच्या विविध भागात हा सण कसा साजरा केला जातो,हे बघूया.     

दक्षिण भारतात शिवरात्रीच्या आदल्या दिवशी एकभुक्त राहून हे व्रत साजरे केले जाते. पण महाशिवरात्रीला नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेऊन शंकराला तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. यजुर्वेदाचे पठन आणि बेलाची पाने आणि तील घातलेल्या भाताचा नैवेद्य असे विविध प्रकार आहेत. काश्मीर मधे महाशिवरात्रीला होणारी बर्फवृष्टी शुभ मानली जाते. शंकराचार्य टेकडी मंदिरात भक्त दिवसभर दर्शन घेतात.शंकराला कमळाची फुले वाहण्याची प्रथा आहे. तर ईशान्य भारतात आसामात शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर येथे भाविक दर्शनाला जातात. तिथे यात्रेचे आयोजन केले जाते. उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान,मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात. बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी देखिल महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .

 महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा  

            महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या पाच ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. पण त्या शिवाय खालील ठिकाणी यात्रा भरतात.

अहमदनगर जिल्ह्यात  श्री अगस्ती मंदिर, अकोले येथे,ठाणे जिल्ह्यात बरनाथ येथे, गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी जवळील महादेवगढ मंदिरात तसेच कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील मंदिरात, गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडादेव  मंदिरात,औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ लेण्यांजवळील गरुडेश्वर मंदिर, खडकेश्वर मंदिर, कोल्हापूर जवळ कण्हेरी मठातील शिव मंदिरात, कोल्हापूर जवळील रामलिंग मंदिरात, पुणे जिल्ह्यात वेल्हे येथील धान्येश्वर मंदिर, वाघोली येथील वागेश्वर मंदिर, मुंबई जवळील घारापुरी लेण्या, अकोला येथील राजराजेश्वर मंदिर, राजापूर जवळील धुतपापेश्वर मंदिर,सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ, सातारा जिल्ह्यात कोटेश्वर मंदिर, सोलापूर येथील काड सिद्धेश्वर अशा विविध ठिकाणी यात्रा भरविली जाते.यात्रा हा एक खरेदी विक्री करण्याच्या जागेव्यतिरिक्त नवीन पिढीला आपल्या संस्कृती आणि परंपरेची ओळख होते.ह्या यात्रा आणि विविध सण हे साजरे करण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे बारा बलुतेदारांना काम मिळते.मंदिरातील ब्राम्हण, पूजा सामान विकणारे,फूल विकणारे,हॉटेल व्यावसायिक, पूर्वीच्या काळी आणि अजूनही काही भागात त्या त्या ठिकाणी निर्माण केली जाणारी लाकडाची खेळणी तयार करून विकणारे, स्वयंपाकायोग्य वस्तूंची खरेदी देखिल ग्रामीण भागातील लोक अजूनही यात्रेतून करीत असतात.अशा ह्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या ह्या यात्रा आणि परंपरा पुढे न्यायला हव्या.

            सर्व वाचकांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.

 

 

  प्रसाद नातु,पुणे.                      

                    




Comments

Post a Comment