ब्लॉग नं. 2026/147.
दिनांक: 27 मे, 2026.
मित्रांनो,
LDL अर्थात ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी करा हे 5 सोपे बदल
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण फिटनेस, प्रोटीनयुक्त आहार आणि वजन नियंत्रण,यावर भर देतो,पण शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळींकडे अनेकदा दुर्लक्ष करतो.विशेषतः LDL म्हणजेच ‘बॅड’ कोलेस्टेरॉल,वाढल्यास ते हृदयासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊन, रक्तप्रवाहाला अडथळा जातो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका,स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.या विषयावर आहे, आजचा ब्लॉग.
सविस्तर:
पूर्वी ही समस्या केवळ वयस्कर लोकांमध्ये दिसत होती,पण आजकाल तरुणांमध्येही वाढलेले कोलेस्टेरॉल सामान्य झाले आहे. चुकीचा आहार,ताणतणाव,व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता,ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे,योग्य जीवनशैली अंगीकारल्यास LDL कोलेस्टेरॉल, मोठ्या प्रमाणात कमी करता येते.
यूकेतील प्रसिद्ध सर्जन Dr. Karan Rajan,यांनी स्वतःच्या दिनचर्येत केलेले काही महत्त्वाचे बदल, शेअर केले आहेत.या सवयींमुळे त्यांनी स्वतःचे कोलेस्टेरॉल,नियंत्रणात आणले.चला जाणून घेऊया त्या 5 प्रभावी सवयींबद्दल.
1. सॉल्युबल फायबरचा आहारात समावेश करा:
सॉल्युबल फायबर म्हणजे असे तंतुमय पदार्थ जे शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल शोषून घेण्यास मदत करतात. रोजच्या आहारात फक्त 5 ते 10 ग्रॅम सॉल्युबल फायबर वाढवल्यास LDL कोलेस्टेरॉल 5 ते 10 टक्क्यांनी कमी होऊ शकते. यासाठी ओट्स, मसूर डाळ, हरभरा, राजमा, बीन्स आणि इतर कडधान्यांचा नियमित वापर करा. हे पदार्थ केवळ कोलेस्टेरॉल कमी करत नाहीत, तर पचनक्रियाही सुधारतात आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना देतात.
2. सॅच्युरेटेड फॅट टाळा आणि हेल्दी फॅट निवडा:
आपल्या स्वयंपाकात वापरले जाणारे लोणी, तूप, प्रक्रिया केलेले मांस आणि तळलेले पदार्थ शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढवतात.त्यामुळे या पदार्थांचे प्रमाण कमी करून त्याऐवजी हेल्दी फॅट्सचा वापर करणे फायदेशीर ठरते. ऑलिव्ह ऑईल, बदाम, अक्रोड, जवसाच्या बिया आणि ओमेगा-3 युक्त मासे हे शरीरासाठी उपयुक्त फॅट्सचे उत्तम स्रोत आहेत. संशोधनानुसार, सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅट वापरल्यास LDL कोलेस्टेरॉल 17 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
3. प्लांट प्रोटीनला प्राधान्य द्या:
प्राणिजन्य प्रथिनांमध्ये अनेकदा,जास्त प्रमाणात फॅट आणि कोलेस्टेरॉल असते.त्याऐवजी वनस्पतीजन्य प्रथिने शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात.सोयाबीन,टोफू,मसूर,मूग, चणे आणि इतर कडधान्ये ही प्रोटीनची उत्कृष्ट स्रोत आहेत.हे पदार्थ हृदयासाठी सुरक्षित असून LDL कमी करण्यात मदत करतात. याशिवाय शरीराला आवश्यक पोषणही मिळते.
4. वजन नियंत्रणात ठेवा:
अधिक वजनामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्स वाढतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त 5 ते 10 टक्के वजन कमी केल्यासही LDL कोलेस्टेरॉलमध्ये लक्षणीय घट दिसून येते.वजन कमी केल्याने शरीरातील सूज कमी होते, रक्तदाब सुधारतो आणि HDL म्हणजेच ‘गुड’ कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित हालचाल यांना प्राधान्य द्या.
5. नियमित व्यायामाची सवय लावा:
दररोज थोडा वेळ शरीरासाठी दिल्यास,हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकते. आठवड्यातून किमान 150 मिनिटे एरोबिक व्यायाम जसे वेगाने चालणे, सायकल चालवणे, योगा किंवा पोहणे केल्याने LDL कमी होण्यास मदत होते.व्यायामामुळे रक्तप्रवाह सुधारतो, शरीरातील सूज कमी होते आणि मानसिक ताणही कमी होतो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात.
समारोप:
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी,नेहमीच औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी सवयींच्या मदतीने,LDL कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या कमी करता येते.छोटे-छोटे बदल दीर्घकाळ टिकवून ठेवल्यास,हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.आजपासूनच या 5 सवयी आपल्या जीवनात अंगीकारा आणि निरोगी हृदयासोबत आरोग्यदायी आयुष्याचा आनंद घ्या.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
होलीस्टीक हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Nice information
ReplyDeleteNice information
ReplyDelete🙏RR
ReplyDelete