ब्लॉग नं. 2026/133.
दिनांक: 13 मे, 2026.
मित्रांनो,
नुकतेच पंतप्रधानांनी देशाला उद्देशून एक महत्त्वाचे आवाहन केले आहे: पुढील एक वर्ष सोने खरेदी थांबवणे आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत काटकसरीचे धोरण अवलंबणे. सामान्य नागरिकाला वाटू शकते की, माझ्या वैयक्तिक सोने खरेदीचा किंवा गाडीच्या पेट्रोलचा,देशाच्या अर्थव्यवस्थेशी इतका मोठा काय संबंध? परंतु,यामागे 'परकीय चलन साठा' (Foreign Exchange Reserves) वाचवण्याचे,एक मोठे गणित दडलेले आहे.या संबंधी आपण आजच्या ब्लॉगमधून माहिती करून घेणार आहोत.
सविस्तर:
यावर पुढे काही लिहायच्या आधी मी हे स्पष्ट करू इच्छितो की, कुणाच्या पक्षाकडून नव्हे,तर देशाचा नागरिक म्हणून या प्रश्नाकडे पहातो. आपल्या सगळ्यांच्या मनांत “देश प्रथम” ही भावना असली पाहिजे.या भावनेतून पंतप्रधानांनी जे आवाहन केले आहे, त्याकडे पाहूया.
1. भारत, सोने आणि आयात (The Gold Connection):
भारतात
सोन्याला केवळ दागिना म्हणून नाही,तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. परंतु,
भारताकडे स्वतःच्या सोन्याच्या खाणी अत्यंत कमी आहेत.परिणामी,आपल्या देशातील सोन्याची
मागणी पूर्ण करण्यासाठी,आपल्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोने परदेशातून
आयात करावे लागते.
जेव्हा आपण सोने आयात करतो,तेव्हा त्याचे पैसे भारतीय रुपयात देऊन चालत नाही.आंतरराष्ट्रीय
बाजारपेठेत हे व्यवहार 'अमेरिकन डॉलर्स'मध्ये होतात. त्यामुळे, जेवढे जास्त सोने आपण
खरेदी करू,तेवढे जास्त डॉलर्स आपल्याला,देशाला द्यावे लागतात. यामुळे
देशाचा परकीय चलन साठा कमी होतो.जर आपण एक वर्ष सोने खरेदी थांबवली, तर अब्जावधी डॉलर्सची
बचत होऊ शकते, जी देशाच्या इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरता येईल.ही महत्वाची कामे अर्थातच उत्पादक स्वरूपाची असली पाहिजेत.
२. कच्च्या तेलाचे अर्थशास्त्र (Oil and Austerity)
भारताच्या एकूण आयातीमध्ये कच्च्या तेलाचा (Crude Oil) वाटा सर्वात मोठा आहे.वाहतूक,उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी,आपण पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहोत.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली,तरी भारताच्या परकीय चलन साठ्यावर मोठा ताण येतो.सध्या आखातातील युद्धामुळे किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे तेल आयातीवर,अर्थातच आपल्याला जास्त पैसा खर्च करावा लागणार आहे.पंतप्रधानांनी तेल उत्पादनांच्या बाबतीत 'काटकसर' (Austerity) करण्यास सांगितले आहे, कारण आपण जेवढे कमी इंधन वापरू, तेवढी कमी आयात करावी लागेल. इंधन बचत म्हणजे थेट डॉलरची बचत आहे. यामुळे 'व्यापारी तूट' (Trade Deficit) कमी होण्यास मदत होते.
3. परकीय चलन साठा का महत्त्वाचा आहे?
परकीय चलन साठा हा कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचा आरसा असतो. याचा वापर खालील कारणांसाठी होतो:
· रुपयाचे मूल्य टिकवणे: जर डॉलरचा साठा कमी झाला,तर रुपयाची किंमत घसरते आणि महागाई वाढते.
· आत्पकालीन स्थिती: युद्ध किंवा जागतिक आर्थिक मंदीच्या काळात,जीवनावश्यक वस्तू (उदा. औषधे, अन्नधान्य) आयात करण्यासाठी हा साठा कामाला येतो.
· एवढेच नव्हे तर,एखाद्या गोष्टीचे जसे की अन्नधान्य आहे,उत्पादन देशात कमी झाले तर,त्या वस्तूची आयात करण्याच्या कामी येते.
· काही मशीनरीचे भारतात उत्पादन होत नाही, किंवा राफेल सारख्या विमानांचे उत्पादन भारतात होत नाही,ते खरेदी करण्यासाठी US$ लागतात.
· गुंतवणूकदारांचा विश्वास: ज्या देशाकडे मजबूत परकीय चलन साठा असतो, तिथे परदेशी कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात.आज भारताच्या परकीय गंगाजळी $ 690 अब्ज ते $ 700 अब्ज च्या घरात आहेत. ज्या फेब्रुवारीमध्ये $ 728 अब्ज एवढ्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या होत्या.आता त्या कमी झाल्या आहेत, जरी त्या खूप मोठ्या प्रमाणात सध्या दिसत असल्या तरी,त्या,त्या पातळीवर असणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी ब्राजील, इतक्यात श्रीलंका किंवा पाकिस्तान यांची जी स्थिती झाली,तशी होऊ नये,यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे.
समारोप:
सोने खरेदी टाळणे आणि इंधन वाचवणे हे केवळ वैयक्तिक बचतीचे मार्ग नाहीत, तर ती एक 'देशसेवा' आहे. जेव्हा आपण या दोन गोष्टींवर नियंत्रण मिळवतो, तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे भारताचा रुपया मजबूत करत असतो आणि देशाची आर्थिक तटबंदी भक्कम करत असतो.चला तर मग,पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन,देशाच्या आर्थिक प्रगतीत आपला खारीचा वाटा उचलूया.पण त्याच सोबत नेत्याच्या कारसोबत जाणाऱ्या,20-25 कारचा ताफा थांबवा, मोठमोठ्या सभांचे आयोजन आणि त्यासाठी गर्दी जमा करण्यासाठी वाहने वापरणे थांबवा.कमीतकमी भाजपा शासित राज्यांनी आणि भाजपा या पक्षाने,पंतप्रधानांच्या आवाहनाला साद दिली तरी,त्याच्या मागोमाग लाखों करोडो लोक हा मार्ग चोखाळतील.आधी केले आणि मग सांगितले,तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसेल.तसंही भारत भाजपमय झाल्याचे नकाशे परवा,एका चॅनेलवर दाखविण्यात आले होते.महाराष्ट्र सरकारने या संबंधात परवाच दिशा निर्देश जारी केले आहेत. याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.

सर, देशातील लोकसंख्येच्या पाच टक्के लोकांकडे जवळ जवळ 80 टक्के संपत्ती आहे. उरलेल्या 95 टक्के लोकांकडे 20% पण संपत्ती नाही आहे. 95 टक्के लोकांकडे क्रयशक्ती नसल्यामुळे स्वाभाविकच उरलेल्या पाच टक्के लोकांनी त्यांना आत्तापर्यंत मिळालेल्या सोयी सवलतींचा व मिळवलेल्या संपत्तीचा एक टक्का हिस्सा जरी देशाला दिला तरी सुद्धा आपल्या पंतप्रधानांना असं आवाहन करण्याची गरजच नाही. 95 टक्के लोकं सोने खरेदी करत असतील तर त्यांचं प्रमाण समुद्रातल्या पाण्याच्या एका थेंबा इतपत पण नाही. पोटापाण्यासाठी प्रवास करतानाच त्यांच्या खिशातले पैसे जातात याची त्यांच्या काळजाला टाच पडते. म्हणूनच ते सार्वजनिक वाहनांचा उपयोग करतात किंवा दुचाकीचा उपयोग करतात. काहीजण तर चालणं पसंत करतात. काही जणांच्या वाटेला एक वेळचं भोजन ही नीट मिळत नाहीत.
ReplyDeleteस्वातंत्र्योत्तर काळात या पाच टक्के लोकांनी कमावलं आहे की त्यांच्या हजारो पिढ्या बसून खातील. त्यातला एक टक्का हिस्सा म्हणजे समुद्रातला एक थेंब पण नाही.
तेव्हा पंतप्रधानांच्या आवाहनाची वाट न बघता त्यांनी स्वतःहून एक टक्के राष्ट्राला अर्पण करावा असे मला वाटतं
सुंदर विवेचन
ReplyDelete🙏RR
ReplyDelete