ब्लॉग नं. 2026/139.
दिनांक: 19 मे, 2026.
मित्रांनो,
'स्लीप डेब्ट': 6
तासांपेक्षा कमी झोप घेताय? तर तुम्ही आरोग्याशी खेळत
आहात
आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत,कामाचा
प्रचंड ताण असणे,हे जणू अभिमानाचे लक्षण मानले जाते."मी तर
फक्त 5-6 तासांच्या झोपेवर अगदी
आरामात काम भागवतो,"
असे सांगणारे लोक आपल्याला आजूबाजूला सर्रास भेटतात. रात्री
उशिरापर्यंत जागून डेडलाइन्स पूर्ण करणे, डोळ्यांखाली
काळी वर्तुळे आणि तीव्र डोकेदुखी घेऊन,कॉफीच्या
मदतीने दिवस ढकलणे,ही अनेकांची रोजची दिनचर्या झाली आहे.
पण
ज्याला आपण 'उत्पादकता' (Productivity) समजतो, ती प्रत्यक्षात आपल्या शरीराला आतून पोखरत आहे. नवीन संशोधनातून एक
धक्कादायक वास्तव समोर आले आहे,सातत्याने 6
तासांपेक्षा कमी झोप घेणे म्हणजे, केवळ सुस्ती येणे
नव्हे, तर शरीराच्या अनेक महत्त्वाच्या यंत्रणा कोलमडून पडणे होय.या संबंधी सविस्तर जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.
सविस्तर:
अपुऱ्या झोपेचा
शरीरावर होणारे 5 गंभीर परिणाम:
अपुऱ्या झोपेचे शरीरावर
होणारे 5 गंभीर परिणाम कोणते, ते आता आपण जाणून घेऊ.
1. चयापचय बिघडणे, भूक
आणि वजन वाढणे:
जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही,तेव्हा
शरीरातील भूक नियंत्रित करणारे संप्रेरक (Horomones) बिघडतात.
तृप्ती देणारे 'लेप्टिन' संप्रेरक
कमी होते आणि भूक वाढवणारे 'घ्रेलीन' संप्रेरक वाढते.
धोका: रात्री 7-8 तासांऐवजी 5-7 तास
झोपल्यास,प्री-डायबिटीज किंवा टाईप 2 मधुमेह
होण्याचा धोका,थेट दुप्पट होतो.एका 13
वर्षांच्या
अभ्यासानुसार,तरुण वयात 6 तासांपेक्षा कमी
झोपणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाचा (उच्च BMI) धोका 7.5
पट
जास्त असतो.
2. हृदयाचे आरोग्य धोक्यात:
झोपेच्या वेळी आपले हृदय आणि रक्तवाहिन्या स्वतःची दुरुस्ती
करत असतात. झोप अपुरी राहिली की ही दुरुस्ती अपूर्ण राहते.सुमारे 4,000 प्रौढांवर केलेल्या अभ्यासानुसार, 6
तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांच्या धमन्यांमध्ये प्लॉक (Atherosclerosis) जमण्याचा धोका 27% जास्त
असतो, ज्यामुळे पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
3. मेंदूची कार्यक्षमता घटणे आणि
स्मृतिभ्रंश:
अपुऱ्या झोपेमुळे मेंदूतील विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ
बाहेर टाकण्याची प्रक्रिया मंदावते.यामुळे एकाग्रता कमी होणे,निर्णयक्षमता
बिघडणे आणि स्मरणशक्ती कमकुवत होणे,अशा समस्या
उद्भवतात.दीर्घकाळ कमी झोपणाऱ्यांमध्ये नैराश्य (Depression), चिंता (Anxiety)
आणि भविष्यात स्मृतिभ्रंशाचा (Dementia) धोका प्रचंड वाढतो.
4. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे:
झोपेत आपले शरीर संसर्गाशी लढण्याची तयारी करत असते. 6
तासांपेक्षा कमी झोपल्याने तणाव आणि रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित शेकडो जनुके (Genes) विस्कळीत होतात.परिणामी,शरीर सतत किरकोळ
तणावाखाली राहते,दाह (Inflammation) वाढतो आणि आजारांमधून बरे होण्याची गती मंदावते.
5. संप्रेरकांचे असंतुलन आणि शरीराची झीज:
झोपेच्या गाढ अवस्थेत शरीर 'ग्रोथ हार्मोन'
(वाढीचे संप्रेरक) स्रवते, जे पेशींची दुरुस्ती
करते. झोप कमी मिळाल्यास थायरॉईड आणि इतर संप्रेरक विस्कळीत होतात.कालांतराने
यामुळे स्नायूंचा ऱ्हास होणे,हाडे कमकुवत होणे आणि जखमा लवकर न भरणे
अशा समस्या सुरू होतात.एका मोठ्या अभ्यासानुसार,5 तास किंवा
त्यापेक्षा कमी झोपणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका 15 टक्क्यांनी
वाढतो.
समारोप:
तुम्ही विचाराल या
दुष्टचक्रातून बाहेर कसे पडायचे? झोप ही चैनीची गोष्ट नाही, ती शरीराची मूलभूत गरज आहे. हे नुकसान रोजच्या रोज जाणवणार नाही,
पण काही वर्षांनी त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतील. झोपेची
गुणवत्ता सुधारण्यासाठी खालील सोपे बदल करा. नंबर एक: झोपेचे वेळापत्रक पाळा, झोपण्यापूर्वी
किमान पाऊण तास मोबाईल,
लॅपटॉपच्या स्क्रीन आणि प्रखर प्रकाश बंद करा. झोपण्याची खोली
अंधारी, शांत आणि थंड ठेवा. झोपण्याच्या वेळेआधी जड
जेवण, तीव्र कॉफी, चहा किंवा अल्कोहोल घेणे टाळा. हे
सर्व उपाय करूनही,जर तुम्हाला पुरेशी झोप लागत नसेल,किंवा
सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नसेल,तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे 'स्लीप ॲप्निया' किंवा 'दीर्घकालीन निद्रानाश' (Insomnia) यांसारख्या
आजारांचे लक्षण असू शकते.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला
कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर
लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
होलीस्टीक हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर
लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला
घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

छान माहिती
ReplyDelete🙏RR
ReplyDelete🙏RR
ReplyDelete