ब्लॉग नं.2025/227.
दिनांकः 17 ऑगस्ट, 2025.
मित्रांनो,
हृदयाची धडधड – साधं लक्षण की गंभीर इशारा?
आपल्यापैकी अनेकांना तो क्षण नक्की आठवत असेल,जेव्हा अचानक हृदय जोराने, वेगाने धडधडायला लागतं. ही धडधड कधी छातीत, कधी घशात, तर कधी मानेला जाणवते. काही सेकंदांची ही अवस्था अस्वस्थ करणारी असली, तरी ती नेहमीच गंभीर आजाराची चिन्हे नसतात. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे ही चूक ठरू शकते.चला तर मग, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊया – हृदय धडधडणे म्हणजे काय, ते कधी साधारण असते आणि कधी आरोग्याचा लाल इशारा ठरते.हे सविस्तर आजच्या ब्लॉगमधून.
हृदय धडधडणे म्हणजे काय?
मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील कन्सल्टंट कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे सांगतात.
“धडधडणे म्हणजे तुमचे हृदय अनियमित, खूप वेगाने किंवा जास्त जोरात धडधडत असल्याची भावना.” ही अवस्था बसल्या-बसल्या जाणवू शकते किंवा व्यायामानंतर अचानक येऊ शकते.
धडधडण्याची सामान्य कारणे:
धडधडण्याच्या सामान्य कारणांमद्धे ताणतणाव किंवा चिंता, जास्त कॅफिन किंवा अल्कोहोल घेणे, पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) अर्थात कमी पाणी पिणे, ताप येणे, हार्मोनल बदल आणि काही औषधांचे दुष्परिणाम यांचा समावेश होतो.
कधी हे गंभीर असू शकते?
कधी कधी धडधड ही गंभीर आजाराची खूण असते, जसे की,थायरॉईड विकार, हृदयाच्या लयातील बिघाड (Arrhythmia) किंवा हृदयरोग, छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास या लक्षणांसह धडधड होत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जेव्हा ती बहुधा निरुपद्रवी असते:
जर आपण निरोगी असाल आणि धडधड फक्त कधीतरी होत असेल, तर ती जीवनशैलीशी संबंधित असण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, सकाळचा ट्रिपल एस्प्रेसो, अचानक आलेली तणावपूर्ण ईमेल, उशिरा पाहिलेला थ्रिलर चित्रपट
ग्लेनेगल्स हॉस्पिटल, मुंबई येथील डॉ. स्वरूप स्वराज पाल यांच्या मते –
“धडधडणे अनेकदा केवळ शरीराला विश्रांती हवी आहे याचे संकेत असतात.”
कधी घ्यावी गंभीर दखल?
धडधड वारंवार होत असेल, काही सेकंदांपेक्षा जास्त टिकत असेल किंवा छातीत दुखणे, बेहोशी किंवा श्वास घेण्यास त्रास अशा लक्षणांसह येत असेल, तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
डॉ. पाल सल्ला देतात:
धडधड येण्याच्या लक्षणांकडे लक्ष द्या, तिसऱ्या कॉफीनंतर?, तीव्र व्यायामानंतर? किंवा जोरदार वादानंतर? कारण शोधण्यासाठी हा पॅटर्न महत्त्वाचा ठरतो.
धडधडण्याची डायरी ठेवा:
तज्ञांच्या मते, लक्षणांचा मागोवा ठेवणे डॉक्टरांना कारण शोधण्यात मदत करते. याची नोंद करा, धडधड किती वेळा झाली, धडधड किती वेळ टिकली, सुरू होण्यापूर्वी आपण काय करत होतात, हा डेटा अनावश्यक चिंता टाळतो आणि गंभीर समस्या असल्यास ती वेळेत शोधण्यास मदत करतो.यांत जीवनशैलीतील बदल मदत करतील
डॉ. भामरे यांचा सल्ला:
कॅफिन, एनर्जी ड्रिंक्स आणि अल्कोहोल कमी करा, पुरेसे पाणी प्या, तणाव कमी करा – योग, ध्यान, खोल श्वास, किंवा मोबाईलशिवाय फेरफटका, पुरेशी झोप घ्या,
डॉ. पाल सांगतात –
“कधीकधी फक्त स्वतःला शांत केल्याने ताणामुळे होणारी धडधड कमी होते.” धडधड शांत करण्यासाठी,तज्ञ खोलवर अर्थात दीर्घ श्वास घ्यायला सुचवितात.
समारोप:
आपल्या हृदयाकडे दुर्लक्ष करू नये. कारण हृदय केवळ आपलं शरीर चालवत नाही, तर जीवनाचा गाभा आहे. किरकोळ वाटणारे धडधडणेही कधी गंभीर स्वरूप घेऊ शकते. त्यामुळे वेळेत तपासणी, योग्य जीवनशैली आणि तणाव नियंत्रण हे हृदय निरोगी ठेवण्याचे सोपे उपाय आहेत.कधीकधी होणाऱ्या धडधडीला फारसे महत्त्व न देणे ठीक आहे, पण त्याकडे कायम दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
आपल्या हृदयाचे म्हणणे ऐका – ते तुमच्याशी बोलत असते! ❤️
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
✍🏻 लेखक: प्रसाद नातु
(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

महत्त्वपूर्ण माहिती
ReplyDeleteअतिशय उपयुक्त ब्लॉग
ReplyDeleteह्रदय संबंधित परिपूर्ण माहिती
मिलिंद निमदेव