Blog No. 2024/ 154.
Date: 17th,July 2024
मित्रांनो,
आज मी नेहमीच्या सवयीप्रमाणे आधीच एका विषयावर ब्लॉग लिहिलेला होता,पण आज मोठी
एकादशी अर्थात आषाढी एकादशी. लाखो श्री विठ्ठलभक्त जे
वारकरी म्हणून ओळखले जातात,ते जय जय राम कृष्ण हरी, ग्यानबा तुकारामचा गजर करत त्या
पंढरपूरला,त्या पंढरीला,त्या भूवैकुंठ नगरीला पोहोचतात.त्या वारकऱ्यांसाठी आज सोनियाचा
दिन आहे.ज्या विठ्ठलाचे,पांडुरंगाचे,त्या भक्त वत्सल परमेशाचे रूप साठवून घेऊन मागच्या
वेळेस गांवी परतले असतात,त्याचेच रूप आज पुनः बघायला मिळणार,त्याचे दर्शन आज पुन्हा
लाभणार. खरोखर आज ते मनात नक्की म्हणत असतील, “आजि
सोनियाचा दिनू ,वर्षे अमृताचा घनू,हरी पाहिला रे, हरी पाहिला रे.” त्यामुळे मला आज या विषयावर ब्लॉग लिहिण्याचा मोह आवरला नाही.
या
पंढरपूर नगरीवर वाचायला तुम्हाला बरेच काही मिळेल,पण मी “भूवैकुंठ
,पंढरपूर” हे पुस्तक वाचले. ज्याचे संपादन केले आहे लोकनाथ स्वामी यांनी, जे तुम्हाला या
स्थानाची सगळी ओळख करून देतं. त्या पुस्तकाविषयी मी आज लिहिणार आहे.
दिंडी म्हटलं कि आठवते
वारी.वारी अर्थात पंढरीची,ह्या भुलोकांच्या वैकुंठाची.पंढरपूरचे
मला कायम आकर्षण राहिले आहे.वारी म्हटलं की इतके सारे वारकरी लोक झपाटल्यासारखे,
पायी चालत निघतात.एरवी त्या मानाने दर्शन सावकाश घेता येतं,पण नाही.मी आषाढीला जाणार,मला जायच.मला कुणी विचारले
तर मी म्हणतो,ह्या कलियुगात ज्याने आपल्या भक्ताला दर्शन
दिले,तो एकमेव देव म्हणजे श्री विठ्ठल.हे पुस्तक नव्हे ही
आहे “माहितीची पाठशाळा”. पंढरपूरमधे काय काय आहे हे नेटवर मिळेल.पण तीर्थ पंढरीशी
जोडलेल्या सगळ्याच गोष्टींची ओळख करून देते हे पुस्तक. ISKON ह्या संस्थेकडून मला हे पुस्तक भेट म्हणून 7-8 वर्षापूर्वी
मिळाले होते.जुजबी वाचून काढले होते म्हणा,पण आजकाल आषाढी एकादशी
आली की हे पुस्तक पुनः घेऊन वाचतो. अन ह्या पुस्तकाच्या निमित्ताने खूप काही
लिहिण्यासारखे आहे.हे लक्षांत आले.ह्या पुस्तकाबद्दल ही माहिती तुम्हाला दिली,तर ती श्रीचरणी एक सेवा होईल असे मी मला वाटतं.
1. पंढरपूर धाम महात्म्य:- मित्रांनो,भगवंताचे जे निवासस्थान असते त्यास धाम असे म्हटले जाते.पंढऱपूर हे
भागवत धर्माचे आद्यपीठ,संतांचे माहेरघर आणि दक्षिणेची
द्वारका समजले जाते.असे मानले जाते,की भीमा नदीच्या काठी
कटेवर हात असलेले श्री विठ्ठल,भुक्ती (इच्छित वर) आणि मुक्ती
प्रदान करणारे आहेत.संत तुकाराम महाराजांनी पंढरीचा गौरव करतांना म्हटले आहे,
सकल तीर्थाहुनी ।
पंढरी हे मुगुटमणी ।।
काय सांगो तेथील
शोभा ।
रमावल्लभ जेथे उभा ।
न लभे व्रत तीर्थादानी ।
ते या विठ्ठल
दर्शनी ।।
याचा अर्थ पंढरपूर क्षेत्र सर्व तीर्थाचे मुगुटमणी
आहे. तेथील शोभा मी काय वर्णू. जेथे रमावल्लभ स्वतः उभे आहेत. व्रत, तीर्थ आणि दान करून देखिल जे मिळत नाही, ते केवळ विठ्ठलाच्या दर्शनाने मिळते.
संत नामदेव म्हणतात, “पंढरीचा
वास चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे ।।
पंढरीच्या देवाला ‘नाम’ अतिशय प्रिय आहे असे म्हटले
जाते.पंढरीला नामाला अलौकिक असे महत्व आहे.फक्त नामस्मरण करण्याने देव प्रसन्न
होतो.म्हणूनच संत एकनाथ महाराज
म्हणतात, ‘नामाचा गजर । गर्जे भीमातीर । महिमा
सांगे थोर तुज एका’। ह्या धामाचे
महात्म्य हे, की येथे प्रत्यक्ष परमेश्वर हा
मूर्ती रूपात वास करतो. आषाढी आणि कार्तिकी एकादशीस जो मनुष्य पंढरपूर येथे येतो.
उपवास करून पांडुरंगाची पूजा करतो.त्यास सदगती प्राप्त होते.अशी धारणा आहे.
2. भगवान
श्रीकृष्ण पंढरपुरात कसे आले? दुसऱ्या प्रकरणात
भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात कसे आले,हयाबद्दलची
सविस्तर माहिती आहे.ह्या संबंधात एक आख्यायिका ह्या पुस्तकांत दिली आहे.एकदा
श्रीकृष्णास भेटावयास,त्याची गोकुळातील सखी राधा
द्वारकापुरास आली.श्रीकृष्ण त्या वेळेस आपल्या महालांत होते.राधेला पाहताच
श्रीकृष्णास परमानंद झाला.त्यांनी राधेला हात धरून, आपल्या
मंचकी बसवून घेतले.त्यांचा वार्तालाप सुरु असतांना देवी रुक्मिणी तिथे आली.राधेला
श्रीकृष्णासमवेत पहाताच रुक्मिणीला राग आला.ती रुसून द्वारका सोडून निघून
गेली.तिला शोधत शोधत श्रीकृष्ण तिंडीरवनात म्हणजे चिंचवनात पोहोचले.ते तिंडीरवन
म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आजचे पंढरपूर आहे.तिचा रुसवा काढायचा श्रीकृष्णाने
भरपूर प्रयत्न केला.पण तो दूर झाला नाही.म्हणून पंढरपुरी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी
एकत्र नाहीत.सकल भारतात हे एकमेव मंदिर आहे.
3. भक्त पुंडलिकांची कथा: तिसऱ्या भागात भक्त पुंडलिकांची कथा आहे,जी
सर्वश्रुत आहे.म्हणून मी सविस्तर वर्णन करीत नाही.पण त्यातील महत्वाचे जे काही आहे
ते विषद करतो.भगवंताच्या भेटीला भक्ताने जाणे हे नित्याचे असते.पण प्रत्यक्ष
भगवंताने भक्तांच्या भेटीसाठी जाणे,हे फक्त भक्त पुंडलिकांचे
बाबतीत घडले.पुंडलिकांची भक्ति आणि उपासना अनन्य साधारण अशीच होती.भगवंताला आपल्या
दारी त्याच्या भक्तिमुळे ओढून नेले. म्हणून देवाचे नांव घेण्याआधी येथे भक्ताचे
नांव घेतले जाते.‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल’ म्हटले जाते.पुंडलिकावर देव पांडुरंग प्रसन्न झाले आणि तुला हवा तो वर
माग.असे म्हणताच पुंडलिकाने,मोठ्या नम्रपणे
म्हटले, “मला स्वतःसाठी काही नको.तू भक्तांच्या कल्याणासाठी
इथेच रहा.कुठे जाऊ नकोस.असा वर मागितला.म्हणूनच प्रत्यक्ष भगवंताने येथे मूर्तीरुप
घेऊन राहणे पसंत केले.
4. “दिंडी
सोहळा”: चवथ्या प्रकरणात “दिंडी सोहळा” अर्थात वारी बद्दल
विस्तृत माहिती वाचावयास मिळते.‘वारी’ चा अर्थ
येरझार.आपल्या घरापासून पंढरपुरास पायी चालत जायचे.
पांडुरंगाचे दर्शन घेऊन घरी परत यायचे. वारीची प्रथा फार जुनी आहे. ज्ञानेश्वर
माऊलींचे वडील विठ्ठलपंत वारीस जात असा उल्लेख आढळतो. मुख्य वाऱ्या चार आहेत.चैत्र
वारी,आषाढीची वारी,कार्तिक
वारी आणि माघी वारी.यापैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीस जो मनुष्य,पंढरपूर येथे येतो,उपवास करून पांडुरंगाची पूजा
करतो.त्यास सदगती प्राप्त होते.अशी धारणा आहे.
5. चंद्रभागेचे सविस्तर
वर्णन: चंद्रभागेचे सविस्तर वर्णन ह्या प्रकरणात
आहे.सह्याद्रीच्या चार हजार फुट उंचीच्या शिखरापासून अर्थात भीमा शंकर येथे उगम
पांवलेली,भीमा तीनशे मैल वहात येते आणि पंढरपूर
क्षेत्राजवळ ती चंद्रकोरी प्रमाणे वळण घेऊन,आकार घेते.म्हणून
तिला पंढरपूरला चंद्रभागा नांव पडले आहे.चंद्रभागेचे विविध
घाट जसे उद्धव घाट, महाद्वार घाट, दत्त
घाट, चंद्रभागा घाट, कुंभार घाट,दिवे घाट, कृष्णाजी घाट, विप्रदत्त
घाट आणि प्रभूपाद घाट ह्याचे सविस्तर वर्णन आहे.ह्या शिवाय डगरी घाट हा आता लुप्त
झाला आहे.
6. ह्या नंतरच्या प्रकरणांमध्ये
नदीच्या परिसरातील विविध मंदिरे, मंदिरांत होणारे वेगवेगळे
उत्सव ह्यांचे वर्णन आणि अन्य उपयोगी माहिती इथे वाचावयास मिळते.तसेच पंढरपुरास
आलेले थोर आचार्य जसे श्री रामानुजाचार्य, शंकराचार्य,
श्री वल्लभाचार्य ह्यांचा उल्लेख आहे.
7. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत
तुकाराम, संत गोरा कुंभार, संत चोखा
मेळा, संत जनाबाई,संत सावता माळी,संत विठोबा खेचर,सोपानदेव,संत
मुक्ताबाई,संत नरहरी सोनार ह्यांनी आध्यात्मिक संस्कृती रुजविण्याचे
आणि जोपासण्याचे मोठे काम केले आहे.विठ्ठलाच्या वारकऱ्यांना जातपात माहिती
नाही.लहान थोर मानित नाही.सगळे एकमेकांना माऊली म्हणून पाया पडतात. “उच
नीच काही नेणे भगवंत,तुष्टे भावभक्ती देखोनिया.” असे संत दामाजी
म्हणून गेले.
समारोप:
माझ्या मते एकही मराठी गायक
नसेल,ज्यास पांडुरंगाचे भजन गाण्याची इच्छा
झाली नाही.हे नामाचे महत्व आहे.हे पुस्तक वाचून झाल्यावर वाटते आहे.पुन्हा एकवार
पंढरीसी जावे.एका वेगळ्या नजरेतून नगरीचे दर्शन घ्यावे. “पंढरीचे सुख नाही
त्रिभुवनी” हे सुख एकवार पुनः अनुभवावे आणि हात जोडून विठ्ठलासी मागावे,“संताच्या या महाराष्ट्र भूमीत जातिभेद आज टोकाला पोहोचला आहे.आज या जातिभेदाचे
खांब उखडून टाकणाऱ्या या दिनी मला एकच मागणं मागावंस वाटतं, “बा
पांडुरंगा,ह्या संताच्या मनातून तर तू जातिभेद नष्ट
केलास.पण कितीही शिक्षित झाला,तरी ह्या जातिभेदाच्या भिंती
माझा मराठी बांधव कां पाडू शकत नाही.ह्या साऱ्यांना सदबुद्धी दे हेच वरदान भक्त
पुंडलिकांसारखा, मला कधी तू भेटलास तर मी मागेन.”
आज शेवटी म्हणूया “पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,पंढरीनाथ महाराज की जय.
प्रसाद नातु,पुणे.

🙏
ReplyDeleteविठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌺
ReplyDelete