ब्लॉग नं. 2026/097.
दिनांक: 7 एप्रिल,2026.
मित्रांनो,
दुखतंय म्हणून लगेच गोळी घेताय? थांबा ! किचनमधील 'हे' पदार्थ करतात नॅचरल पेनकिलरचे काम. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात डोकं दुखणं,ॲसिडीटी होणं किंवा अंगदुखी यांसारखे त्रास होणे,अगदी सामान्य झाले आहे.अशावेळी आपण काय करतो? कपाटातून एखादी पेनकिलर काढतो आणि ती घेतो.पण तुम्हाला माहिती आहे का, की अशा प्रकारे स्वतःच्या मनाने वारंवार औषधे घेणे शरीरासाठी किती घातक ठरू शकते? याबद्दल माहिती करून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये.
सविस्तर:
डॉक्टरांच्या मते, प्रत्येक लहान-सहान दुखण्यावर पेनकिलर घेणे,किडनी आणि लिव्हरवर परिणाम करू शकते.म्हणूनच, पेनकिलर घेण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरातील,किंवा निसर्गातील काही पदार्थांचा वापर करणे कधीही उत्तम.डॉ. रुपाली लवाटे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून,अशाच काही नैसर्गिक 'पेनकिलर' फळांची आणि पदार्थांची माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या त्रासावर कोणते फळ गुणकारी ठरते:
1. डोकेदुखी आणि ॲसिडीटीसाठी: केळी
अनेकदा शरीरातील पित्त वाढल्यामुळे किंवा ॲसिडीटीमुळे डोकेदुखी सुरू होते.अशा वेळी गोळी घेण्यापेक्षा एक केळ खाणे फायदेशीर ठरते.केळी ॲसिड न्यूट्रलाईज करण्यास मदत करते,ज्यामुळे डोकेदुखीमध्ये लगेच आराम मिळतो.
2. पोट साफ होत नसेल तर: सफरचंद आणि केळी
बद्धकोष्ठता (Constipation) हा अनेक आजारांचे मूळ आहे.जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर नियमितपणे सफरचंद खाण्याची सवय लावा.यासोबतच केळी खाणेदेखील पोट साफ होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
3. घसा खवखवणे किंवा दुखणे: मध
सर्दी होण्याच्या आधी घसा दुखून येतो किंवा घशात खवखव होते.अशा वेळी अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेले मध चाटावे. यामुळे घशाला आराम मिळतो आणि संसर्ग वाढत नाही.
4. दात किंवा दाढदुखीसाठी: लवंग
दात दुखीवर रामबाण उपाय म्हणजे लवंग.ज्या दातात किंवा दाढेत वेदना होत आहेत, तिथे एक लवंग दाबून धरा. लवंगातील नैसर्गिक तेल वेदना कमी करण्यास आणि जंतूनाशक म्हणून काम करते.
5. थकवा आणि अशक्तपणा: संत्री आणि लिंबू पाणी
जर तुम्हाला सतत गळून गेल्यासारखे वाटत असेल किंवा काम करण्याचा उत्साह नसेल, तर संत्री खा. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स तुम्हाला झटपट ऊर्जा देतात.ताजे लिंबू पाणी पिणे हा देखील थकवा दूर करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
6. निद्रानाशाचा त्रास: किवी
रात्री वेळेवर झोप येत नसेल तर,काही दिवस नियमितपणे 'किवी' या फळाचे सेवन करून पहा. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
7. पोट फुगणे किंवा जड होणे: ताजे दही
अति जेवल्यामुळे किंवा जड जेवणामुळे,अनेकदा पोट फुगल्यासारखे किंवा कडक झाल्यासारखे वाटते. अशा अस्वस्थतेवर एक वाटी ताजे दही खाणे हा उत्तम उपाय आहे.दह्यातील प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात.
8. अपचन (Indigestion): आले
जर खाल्लेले अन्न पचत नसेल किंवा मळमळत असेल,तर आल्याचा एक छोटा तुकडा खावा किंवा आल्याचा काढा करून प्यावा.आल्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते.
समारोपः-
हे घरगुती उपाय प्राथमिक त्रासासाठी अत्यंत प्रभावी आहेत.मात्र,जर तुमचे दुखणे जुने असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा
लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी
संपर्क करावा.

केळ सोडलं तर बाकीचे सर्व उपाय मी वापरतो. पण माझे प्रश्न चिवट असल्यामुळे विशेष फायदा होत नाही. पण मानसिक समाधान मात्र खूप मिळतं. ऍसिडिटी वर दुसरा इलाज म्हणजे सोलकढी. नारळाचे दूध कमी वापरून तुरट होईल अशी सोलकढी बनवायची आणि प्यायचं. सगळं पित्त बाहेर पडतं आणि ऍसिडिटी गुल होते. पोट सुद्धा साफ होतं
ReplyDelete