ब्लॉग नं.2026/069
दिनांकः 10 मार्च, 2026.
मित्रांनो,
मधुमेहाबद्दलचे
पाच मोठे गैरसमज आणि सत्य
यावर्षी
14 नोव्हेंबरला,साजरा होणाऱ्या जागतिक मधुमेह दिनाची थीम आहे,“मधुमेह आणि कल्याण”. या थीमचा मुख्य
संदेश असा आहे की,मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ रक्तातील साखरेची पातळी तपासण्यापुरते
मर्यादित नसून, संतुलित, निरोगी आणि
शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारणे तितकेच महत्त्वाचे आहे.आजच्या ब्लॉग मध्ये हे सविस्तर
जाणून घेऊ.
सविस्तर:
आज
जगभरात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.तरीही या आजाराबद्दल अनेक मिथक
(गैरसमज) समाजात खोलवर रुजलेले आहेत.या गैरसमजांमुळे अनेक वेळा रुग्ण गोंधळून
जातात, चुकीचे
निर्णय घेतात किंवा योग्य उपचार सुरू करण्यास उशीर करतात.
एंडोक्राइनोलॉजीचे
तज्ज्ञ डॉ. हिमांशू शर्मा यांनी मधुमेहाबद्दलचे काही सामान्य गैरसमज स्पष्ट केले
आहेत.चला,त्यातील
पाच प्रमुख मिथक आणि त्यामागील सत्य समजून घेऊया.
1. गैरसमज:
साखर खाल्ल्यानेच मधुमेह होतो:
अनेकांना
वाटते की,साखर खाल्ल्यामुळेच मधुमेह होतो.परंतु प्रत्यक्षात हे पूर्ण सत्य नाही.
विशेषतः टाइप 2 मधुमेह,हा
अनेक घटकांच्या संयोगामुळे होतो. त्यामध्ये पुढील गोष्टी महत्त्वाच्या असतात: अनुवंशिकता
(Genetics), इन्सुलिन प्रतिरोध (Insulin Resistance), जास्त वजन किंवा लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, साखरयुक्त पदार्थ थेट मधुमेह निर्माण करत नसले तरी त्यांचे अतिसेवन वजन
वाढवते आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.म्हणूनच कधीतरी गोड खाल्ल्याने
मधुमेह होत नाही, पण सतत असंतुलित आहार आणि निष्क्रिय
जीवनशैली दीर्घकालीन धोकादायक ठरू शकते.
2. गैरसमज:
“साखरमुक्त” (Sugar-free) उत्पादने पूर्णपणे सुरक्षित असतात:
आज
बाजारात अनेक पदार्थांवर “साखरमुक्त” असा लेबल असतो. त्यामुळे अनेक लोकांना वाटते
की हे पदार्थ मधुमेहींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. पण वस्तुस्थिती वेगळी आहे.अशा
अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये पुढील गोष्टी असू शकतात: जसे की,रिफाइंड
पीठ, जास्त स्टार्च, जास्त सोडियम, ट्रान्स फॅट्स, जास्त कॅलरीज हे घटक रक्तातील
साखरेत चढ-उतार निर्माण करू शकतात आणि वजनही वाढवू शकतात. म्हणूनच तज्ज्ञांचा
सल्ला असा आहे की, पोषण लेबल्स नीट वाचा,शक्यतो संपूर्ण नैसर्गिक अन्न खा,प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबी असलेले
संतुलित जेवण घ्या
3. गैरसमज:
इन्सुलिन सुरू करणे म्हणजे मधुमेह खूप गंभीर झाला आहे:
मधुमेहाच्या
उपचारात इन्सुलिन घेणे याबाबत अनेक लोकांच्या मनात भीती आणि कलंक असतो.अनेक रुग्ण
असे समजतात की, “आता माझा मधुमेह खूपच बिघडला आहे.” परंतु प्रत्यक्षात इन्सुलिन हा शरीरात
नैसर्गिकरीत्या तयार होणारा संप्रेरक (हॉर्मोन) आहे. शरीराला रक्तातील ग्लुकोज
नियंत्रित करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. काही परिस्थितींमध्ये डॉक्टर इन्सुलिन
सुचवू शकतात, जसे की,संसर्ग, शस्त्रक्रिया, गर्भधारणा, तीव्र
ताणतणाव, काही वेळा ते तात्पुरते असते. योग्य वेळी इन्सुलिन सुरू केल्याने, गुंतागुंत
टाळता येते, स्वादुपिंडावरचा ताण कमी होतो, दीर्घकालीन अवयवांचे आरोग्य टिकते. म्हणून
इन्सुलिन हा पराभव नसून उपचाराचा सकारात्मक टप्पा आहे.
4. गैरसमज:
मधुमेह असलेल्या लोकांनी फळे खाऊ नयेत:
अनेक
मधुमेही रुग्ण फळे खाणे पूर्णपणे बंद करतात. कारण त्यांना वाटते की फळे खूप गोड
असतात.
पण प्रत्यक्षात फळे ही
पोषणाचा खजिना आहेत. फळांमध्ये असतात, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स,खनिजे, फायबर ही
सर्व घटक शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात.महत्त्वाची गोष्ट म्हणजे:- भाग
नियंत्रण (Portion control) रसाऐवजी संपूर्ण फळे खाणे,कमी किंवा मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे
सुरक्षित असतात, जसे की: सफरचंद, पेरू, संत्री, बेरी. प्रत्येक
व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचे निरीक्षण करून
फळांचे सेवन ठरवणे योग्य ठरते.
5. गैरसमज:
मधुमेह फक्त वृद्धांनाच होतो:
पूर्वी
टाइप 2 मधुमेह हा
प्रौढांचा आजार मानला जात होता. पण आज परिस्थिती बदलली आहे.आता हा आजार
तरुणांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्येही दिसू लागला आहे.यामागील प्रमुख कारणे
आहेत:-बालपणातील लठ्ठपणा, स्क्रीन टाइम वाढणे, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे
वाढते सेवन, मानसिक ताण म्हणूनच प्रतिबंधाची सुरुवात लहानपणापासून करणे आवश्यक
आहे. कुटुंबांनी मुलांमध्ये पुढील सवयी विकसित करणे गरजेचे आहे.जसे की, संतुलित
आहार, नियमित व्यायाम, सक्रिय जीवनशैली,वेळोवेळी आरोग्य तपासणी. लवकर जागरूकता
निर्माण केल्यास भविष्यातील आरोग्य जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
समारोप:
मधुमेह
हा आजार आयुष्यभर असू शकतो, पण तो
नियंत्रणात ठेवता येणारा आजार आहे. योग्य माहिती, संतुलित
आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला यामुळे मधुमेह
असलेली व्यक्तीही,सक्रिय आणि निरोगी जीवन जगू शकते. म्हणूनच मित्रांनो,गैरसमजांवर विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला
यावर विश्वास ठेवा. जागरूकता, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन
या तीन गोष्टींच्या मदतीने आपण मधुमेहावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकतो.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा
भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
अस्वीकरण:
हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित
आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या
डॉक्टरांशी संपर्क करावा.

उपयुक्त माहिती
ReplyDeleteउपायुक्त माहिती,
ReplyDeleteNice information
ReplyDelete