ब्लॉग नं. 2025/128
दिनांक: 9 मे, 2025.
मित्रांनो,
नुकतीच मला बँकेतून सेवानिवृत्त होऊन पाच वर्षे झालीत.बँकेत असतांना कुठे कुठे फिरलो आणि या फिरण्यातून,या प्रवासातून काही मनोरंजक गोष्टी घडल्या आणि काही मनावर परिणाम करून गेल्या.परवा 7 मे, 2025 होती.जुने फोटो पहात असतांना सहज माझी नजर,एका फोटोतील तारखेकडे गेली. 7 मे, 2000, म्हणजे 25 वर्षे झाली त्या प्रसंगाला आणि आठवणी दाटून आल्या.तुम्हाला देखील वाचायला आवडेल,म्हणून शेअर करतो, आजच्या ब्लॉगमध्ये.
सविस्तर:
चंद्रपुर जिल्हातील राजुरा तालुक्यांत राजुऱ्यापासून 13 कि.मी.वर विहीरगांव येथे बॅकेची शाखा होती. 25 सप्टेंबर 1999 ला,मी राजुरा येथून विहीरगांवला जॉइन होण्यासाठी,आपली राजदुत मोटार सायकल घेऊन निघालो.मी पहिल्यांदाच एका शाखेचा मॅनेजर म्हणून चार्ज घेणार होतो.रस्ता बघितलेला नव्हता,पण कुठून जायचं एवढं फक्त माहित होत.आजच्या सारखा मोबाईल नव्हता,त्यामुळे गूगल मॅप देखील मदतीला नव्हता.स्त्यात आधी रेल्वे क्रॉसिंग लागलं.गेट बंद असल्यामुळे थोडं थांबाव लागलं.मग 2 कि मी.वर एक गांव लागलं,सातरी.त्यानंतर उजव्या हाताला दाट जंगल सुरू झालं.मग चनाखा नांवाचं गाव लागल.जंगल एका बाजूला चालूच होत.मी खरं तर जाम घाबरलो होतो.रोज सकाळी या रोडने जायचं,विशेष टेंशन नव्हत.पण संध्याकाळी याच रस्त्याने परत यायचं,म्हणजे कठीण काम.
पूर्वी जंगलातून बसमधून जाणं वेगळं,पण मोटार सायकल वर तेही एकट्याने आणि फर्स्ट टाईम,मग एकदाचं जंगल संपलं.उजव्या हाताला शाळा लागली,बहुतेक हायस्कूल असावी.पुढे चौकात येऊन पोहोचलो.बॅक कुठेच दिसली नाही.चौकात एकाला विचारलं.तो म्हणाला " खुप पुढे आलात साहेब. ब्रॅच मॅनेजर आहात ? चला मी दाखवतो बॅक",असं म्हणत तो मला न विचारता,गाडीवर पाठीमागे बसला.आधी मला थोडा राग आला.पण थोडा विचार केल्यावर छान वाटलं.शहरांतल्या सारखं,केवळ हात वारे दाखवून,आणखी कन्फ्यूज करण्यापेक्षा हे किती छान.हा विचार करत होतो.तेवढ्यांत उजव्या हाताला वळा सर,या सुचनेने तंद्रीतून भानावर आलो.आत एका मध्यम आकाराच्या खोलीत बॅक होती.
मला पहाताच मॅनेजर,"आईये साहाब" असे म्हणत बाहेर आले. 10 वर्ष जुनी शाखा होती ती.त्यामुळे त्या शाखेमध्ये मॅनेजर,कॅशियर,एक शिपाई आणि एक स्वीपर एवढाच स्टाफ होता.मॅनेजरने त्या तिघांची ओळख करून दिली. तशी ओळख सगळ्यांशी होती,कारण स्वीपर सोडला तर,बाकी तिघेही राजुऱ्यास रहात असतं.
हळूहळू सगळं अंगवळणी पडलं.कॅशियर रोज माझ्या सोबतच यायचा आणि जायचा.त्यावेळी चंद्रपुर जिल्ह्यात,MRCP या प्रोजेक्टखाली,प्रत्येक गावात एक ग्राम समितीची,नाबार्ड च्या मदतीने स्थापना केली होती.ही सर्वथा अराजकीय समिती होती.त्यामुळे सगळ्याच गावांमध्ये,मी ओळखला जाऊ लागलो.मग कुठल्याही गांवात कुठलाही कार्यक्रम असला की,मी एक तर उदघाटक, प्रमुख पाहुणा किंवा अध्यक्ष असतं असे.15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी वगळता बाकी सगळेच कार्यक्रम बहुधा रात्री असायचे.
आणि ती तारीख उजाडली:
असंच एकदा कोहपरा या गांवचे सरपंच आणि इतर नागरिक मला बॅकेत भेटायला आले.विदर्भात राष्ट्रसंत तुकडोची महाराजांमुळे,खंजेरी भजन खुप प्रसिध्द आहे.खंजेरी भजन स्पर्धेचं,विदर्भ स्तरीय आयोजन आयोजन करायचं,असा कोहपरा ग्रामवासियांचा मानस असल्याचे व मला उदघाटक म्हणून आमंत्रित करायला,ते आले असल्याचे त्यांनी सांगितले.7 मे, 2000 रोजी रात्री 10 वाजता येण्याचे,त्यांनी आमंत्रण दिलं आणि मी ते संगीताशी संबंधित कार्यक्रम असल्याने आनंदानं स्वीकारलं.कारण अमरावतीला राहिल्याने आणि मोझरी येथे महाराजांचा आश्रम होता,ते अमरावती पासून केवळ 30 कि मी दूर असल्याने,खंजेरी भजनाविषयी आकर्षण होते.तेव्हा शनिवारी हाफ डे असायचा. मी घरी येतांना माझे मित्र अनंत मिसे सरांकडे डोकावलो आणि कार्यक्रमाला चलण्याबध्दल विचारलं.तेही संगीतप्रेमी असल्याने लगेच तयार झाले.
शनिवारी रात्री 9.00 च्या सुमारास आम्ही दोघे माझ्या राजदूतने निघालो.15 -16 कि मी अंतर होते आणि तो महामार्ग ही नव्हता.त्यामुळे अर्ध्या तासांत आम्ही कोहोपरा येथे जाऊन पोहोचलो.सरपंचानी आमचं स्वागत केलं.कार्यक्रमाला वेळ असल्याने,ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून,आजूबाजूला जंगल असल्याने,फॉरेस्ट ऑफिसरना बोलविले होते.आम्ही बोलत असतांना एक फॉरेस्ट गार्ड सरपंचाना भेटायला आला.सरपंच दारापाशी गेले.फॉरेस्ट ऑफिसरना अर्जंट काम असल्याने,ते येऊ शकत नसल्याचा निरोप त्याने दिला.सरपंच आत येऊन मोठ्या काळजीत म्हणाले,साहेब येणार नाहीत.मग एकाने मिसेसाहेब अध्यक्ष पद स्वीकारतील कां? अशी विनंती केली आणि आयत्या वेळी प्रस्ताव ठेवत असल्याबध्दल,खेद व्यक्त केला.मिसे साहेब एक दर्दी व्यक्ती आणि त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबध्दल नितांत आदर असल्याने,त्यांनी विनंती आनंदाने स्विकारली.
अवघ्या 5 मिनीटातच,कार्यक्रम स्थळी येण्याबद्दल निरोप आला.आम्ही पोहोचताच कार्यक्रम सुरू झाला.स्वागत आणि प्रास्ताविक झाले.मग उदघाटन झाल्याची विधिवत घोषणा करण्यासाठी,माझ्या हाती माईक सोपवला गेला.आधीच वेळ झाला असल्याने,मी मनोगत थोडक्यांत आटोपून,उदघाटन झाल्याची घोषणा केली.नंतर बरीच भाषण झाली.शेवटी अध्यक्षीय भाषणासाठी मिसे साहेबांना आमंत्रित केले.मी स्वतः गातो,हे मिसेसाहेबांना माहित होतं.त्यांनी भाषणाची सुरूवात करतांना म्हटले की,या कार्यक्रमाचे उदघाटक नातूसाहेब असल्याने,कार्यक्रमाचे उदघाटन,ते एखादं छानसं भजन गाऊन करतील,असं मला वाटल होत. तुम्हाला माहित नसेल कदाचित,पण तुमचे साहेब चांगले गातात.
एवढं म्हणायचा अवकाश की,मिसे साहेबांचे भाषण संपताच,सरपंचांनी,एखादं भजन सादर करण्याची विनंती केली.गावकऱ्यांचे प्रेम आणि आग्रहापुढे,माझी तयारी नाही वगैरे काही सबब चालली नाही.आधी माझे माहेर पंढरी, मोगरा फुलला अशा फर्माईशी आल्या,मला गावचं लागलं.मग अनुज जलोटाचं एखादं भजन म्हणा तेव्हा ऐसी लागी लगन म्हटलं.स्पर्धक ताटकळेले बघून,मी लोकांना म्हटलं की,स्पर्धक उत्सुकतेने वाट पहात आहेत,स्पर्धा सुरू होण्याची,त्यांच्या मनांत या क्षणाला,जी भावना असेल,म्हणजे नको देवराया अंत असा पाहू ते म्हणतो आणि संपवितो असं म्हणत आवरतं घेतलं. कार्यक्रम रात्रभर चालू रहाणार असल्याने,12 च्या सुमारास आम्हाला निघायची परवानगी दिली.
समारोप:
खरी गोष्ट सांगण्यासारखी पुढेच घडली,मी सोमवारी बॅकेत गेलो.दुपारच्या सुमारास एक आजीबाई काठी टेकत टेकत,बॅकेत आल्या.मॅनेजरना भेटायचंय म्हणाल्या,शिपायाने माझ्या समोर आणून सोडले.मी आजीबाईंच्या दृष्टीने लहानच होतो.आजीबाई म्हणाल्या,“तुच भजन म्हटलसं काल.” मी होकार दिला.“खुप छान गातोस.कान अगदी तृप्त झाले.कर्ज वसुली करणारा मॅनेजर,गाणं ही म्हणू शकतो,असं वाटल नव्हतं कधी. असाच एकदा कार्यक्रम कर एकदा,आमच्या गावात.आशिर्वाद आहेत माझे तुला.” मी त्या माऊलीला वाकून नमस्कार केला.मला मिळालेली ही निर्व्याज शाबासकी मी कधीच विसरू शकणार नाही.अशा आठवणी माणसाचं जीवन अधिक समृद्ध करतात, हेच खरं.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे

Comments
Post a Comment