Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

गजानन दिगंबर माडगुळकर -गदिमा

 Blog No.2023/253             

Date:- 1st, October 2023. 

मित्रांनो,

            आज आधुनिक वाल्मिकी म्हणजेच गजानन दिगंबर माडगुळकर यांची जयंती. ते गदिमा या नावाने प्रसिद्ध होते. एक मराठी कवी,गीतकार,लेखक आणि अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे.पण त्यांची अखिल महाराष्ट्राला जी ओळख झाली,ती गीत रामायणकार म्हणून.आज त्यांच्या 104 व्या जयंती निमित्त हा ब्लॉग त्यांना समर्पित. 

प्रास्ताविक

            गदिमांचा जन्म 1 ऑक्टोबर, 1919 ला सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी झाला.गदिमांचे बालपण माडगुळे या गावी गेले.वडील औंध संस्थानात कारकून होते. त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. मॅट्रिक मात्र ते होऊ शकले नाहीत.घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. त्यांचा विवाह कोल्हापूरच्या विद्या पाटणकर यांच्याशी झाला आणि त्यांना श्रीधर, आनंद, शरतकुमार या नावाची ३ मुले आणि वर्षा, कल्पलता, दीपा, शुभदा या ४ मुली झाल्या. मराठी कविता आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर त्यांचे धाकटे बंधु होत.

 कारकीर्द

त्यांनी 1938 साली ब्रम्हचारी आणि 1939 साली डीची बाटली  या सारख्या गाजलेल्या चित्रपटातील  छोट्या भूमिकातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.त्यानंतर नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली.1947 साली आलेल्या राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामशेजी चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा,गीते यासाठी चांगलीच ओळख मिळाली,त्यात एक भूमिकाही त्यांनी केली आहे.त्यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.

त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट

            त्यांच्या विशेष गाजलेल्या चित्रपटांमध्ये वंदे मातरम, पुढचे पाऊल,बाला जो जो रे, लाखाची गोष्ट, देवबाप्पा, गुळाचा गणपती, पेडगांवचे शहाणे,ऊनपाऊस,मी तुळस तुझ्या अंगणी, जगाच्या पाठीवर, प्रपंच, सुवासिनी, संथ वाहते कृष्णामाई,मुंबईचा जावई या चित्रपटांचा समावेश होतो.त्यांनी 150 पेक्षा जास्त मराठी चित्रपट केले आणि 2000 पेक्षा जास्त गाणी लिहिली. त्याकाळी गदिमा,सुधीर फडके आणि राजा परांजपे ही त्रिकुट प्रसिद्ध झाले होते.त्यांनी पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट,पेडगांवचे शहाणे,वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटात कामही केले होते.

गदिमांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांसाठीही लेखन केले.यामध्ये  ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’, ‘तुफान और दिया’ यासारख्या हिंदी चित्रपटांचा समावेश होतो. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदिमांचीच होती.

गदिमांचे गीत रामायण खूप गाजले.1,एप्रिल 1955 ते 19,एप्रिल 1956 पर्यंत पुणे आकाशवाणीने तो प्रसारित केला. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.गदिमांनी भावगीते,भक्तीगीते, समरगीते, लावणी,बाल गीते,चित्रपट गीते आणि शाहिरी अशा विविध काव्य प्रकारांत आपला ठसा उमटविला.

गदिमांची लोकप्रिय बालगीते

     गदिमांच्या लोकप्रिय बाळगीतांमद्धे नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच,झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया;बाळा जो जो रे बाळा जो जो रे, गोरी गोरीपान, फुलासारखी छान, दादा, मला एक वहिनी आण; चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? यांचा समावेश होतो.  

गदिमांची लोकप्रिय भक्तीगीते –

            गदिमांच्या लोकप्रिय भक्तीगीतांमद्धे कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम ; इंद्रायणी काठी देवाची आळंदी, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, विठ्ठला तू वेडा कुंभार यांचा समावेश होतो.  

 

गदिमांची देशभक्तीपर गीते –

            गदिमांच्या लोकप्रिय देशभक्तीगीतांमद्धे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू, वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम् यांचा समावेश करता येईल.  

गदिमांच्या लोकप्रिय चित्रपटगीते –

बुगडी माझी सांडली ग... जाता साताऱ्याला,सांगा या वेडीला, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे; उद्धवा, अजब तुझे सरकार; या चिमण्यानो परत फिरा रे , फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागंल कोल्हा; अपराध माझा असा काय झाला का रे दुरावा ,का रे अबोला; प्रथम तुज पाहता... जीव वेडावला, रम्यही स्वर्गाहून लंका यांचा समावेश होतो.  

गदिमांच्य लघुकथा

     गदिमांनी एकूण 15 लघुकथा संग्रह लिहिले यात लपलेले ओघ, बांधावरल्या बाभळी,बोलका शंख, वेग आणि इतर कथा, थोरली पाती, तुपाचा नंदादीप, सोने आणि माती, तीन चित्रकथा, कलावंताचे आनंद पर्यटन मंतरलेले दिवस आदि उल्लेखनीय आहेत.   

गदिमांचे काव्यसंग्रह

     गदिमांच्या काव्यसंग्रहांमद्धे जोगिया (राज्य पुरस्कार प्राप्त), चैत्रबन (राज्य पुरस्कार प्राप्त), गीत रामायण (ज्याचा 10 भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.), गीतगोपाल, दोन नृत्यनाटिका (राज्य पुरस्कार प्राप्त) आदि उल्लेखनीय आहेत.

पुरस्कार आणि सन्मान:-

1.        त्यांना 1957 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.

2.        1957 मध्ये त्यांना पद्मश्री या भारताच्या चतुर्थ सर्वोच्य नागरी सन्मानाने गौरवान्वित करण्यात आले.

3.        1969 ला ग्वालियर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

4.        1973 ला यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

5.        1962 ते 1974 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार होते.  

सारांश

            साहित्याच्या विविध प्रांतात आपले भरीव आणि बहुमोल योगदान देणाऱ्या, आधुनिक वाल्मिकी म्हणून गौरविण्यात आलेल्या आणि खरोखर साहित्य तपस्वी म्हणता येईल अशा या महान कलावंतास माझा त्यांच्या 104 व्या जयंती दिनी मानाचा मुजरा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

प्रसाद नातु, पुणे. 

Comments

  1. I learnt lot through this special blog. The inspirational songs were my all time favorites

    ReplyDelete

Post a Comment