Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

तुमचा ईको तुम्ही निवडा

 Blog No. 2023/163       

Date: 25th, June 2023.


 

मित्रांनो  

          आज कालच्या जगात लोकांना प्रेरणा देणं,प्रोत्साहन देणं हे सुद्धा बऱ्याच लोकांचे करिअर झाले आहे.याला कारण जीवनात अनेक कारणांनी येणारी निराशा, वैफल्य. खरं तरं निराशा किंवा वैफल्य यायची कारणे अनेक आहेत. काही अगदी सामान्य कारणे देखिल असतात. कदाचित जीवनापासून आपल्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. किंवा सध्याची जी व्यवस्था आहे, तिला तोंड देण्यास किंवा सामोरे जाण्यास आपण कमी पडतो,सक्षम नाही आहोत.पण एकंदरीत, motivational speaker ना महत्व आले आहे किंवा आपणच ते प्रदान केले आहे.आज आपण एक अशीच गोष्ट बघणार आहोत.ती जीवनाकडे बघायला शिकवते.

 

आपला ईको स्वतः निवडा                      

            एकदा एक माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन गावाजवळच्या जंगलात फिरायला गेला. जंगलात फिरता फिरता अचानक मुलाला काही तरी टोचलं,रुतलं. त्याच्या मुखातून सहजच “आsss” बाहेर पडले.त्याच्या कानी दुरवरच्या डोंगरावरुन “आsss” असाच प्रतिध्वनि कानी आला.त्याला आश्चर्य वाटलं.कारण यापूर्वी त्याला या गोष्टीचा अनुभव आला नव्हता. आलेला प्रतिध्वनि हा त्याचा पहिलाच अनुभव होता.

            कुतुहुलापायी तो पुन्हा एकदा जोरात ओरडला, “तू कोण आहेस?” त्याला तिकडून पुन्हा “तू कोण आहेस?” हेच उत्तर मिळाले.त्याला ते उत्तर ऐकून राग आला. तो पुन्हा मोठ्याने ओरडला, “तू भित्रा आहेस.” त्याला पुनः डोंगरातून तेच उत्तर आले. “तू भित्रा आहेस.” आता मात्र त्याला असे वाटले की कुणी तरी आपल्याला मुद्दाम चिडवतं आहे. त्याने त्याच्या वडिलांना विचारलं “बाबा, हे काय चाललं आहे? मी जे काही म्हणतो आहे पलीकडून तसाच आवाज येतो आहे.तो असं कां करतोय?तो मला चिडवतो आहे कां,बाबा?”

            त्याचे बाबा हसले आणि त्याला म्हणाले, “बेटा,लक्षात घे,त्याच्याशी काही तरी चांगलं बोल बरं.” मग त्याचे बाबा स्वतःच ओरडले “आय लव यू”. लगेच तिकडून प्रतिध्वनि आला “आय लव यू”. मुलगा आश्चर्यचकित झाला.पण तो गोंधळलेला होता. ते बघून त्याचे बाबा पुनः एकदा निसर्गाशी संवाद साधतात. “तू अदभूत आहेस!”  तिकडून पुनः “तू अदभूत आहेस!” असा आवाज आला ते ऐकून मुलगा रोमांचित झाला.पण अजूनही त्याला काय चालले आहे ते समजत नव्हते.तेव्हा त्याला त्याचे बाबा म्हणतात, “मुला याला “ईको” म्हणतात.तुला इतक्यात समजणार नाही. पण खरं तर हेच आयुष्य आहे.तुम्ही इतरांना जे देता तेच हे आयुष्य,हे जीवन तुम्हाला परत करीत असतं.जीवन हा तुमच्या कृतींचा आरसा आहे.”

            मुलाच आता आपल्या बाबांकडे लक्ष नसतं तो आपल्या विश्वात रममाण झालेला असतो. त्याचे बाबा स्वगत बोलल्यासारखे बोलत असतात. “जर तुम्हाला जीवनात प्रेम हवे असेल तर प्रेम द्या.अधिक दयाळूपणा हवा असेल तर तुम्ही अधिक दयाळूपणे वागा. तुम्हाला कुणी समजून घ्यायला हवे असेल तर इतरांना समजून घ्यायला शिका. तुम्हाला आदर हवा असेल तर इतरांना आदर द्या. तुमच्या चुकांना माफी हवी असेल तर इतरांना त्यांच्या चुकांसाठी माफ करा.”

 

सारांश

            निसर्गाचा हा ईको किंवा प्रतिध्वनिचा नियम हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलुला लागू होतो.आपल्याला जीवनात इतरांकडून म्हणा किंवा जीवनाकडून जे हवे आहे, ते ते तुम्ही इतरांसाठी करा.कारण तुम्ही जे देता तेच आयुष्य किंवा जीवन तुम्हाला परत करीत असतं.तुमचे जीवन हा योगायोग नसून तुमच्या कर्माचा आरसा आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे ईको ऐकायचा आहे ना,मग तुमचा ईको तुम्ही स्वतःच निवडा.मी माझा ईको निवडला आहे. माझा ईको “प्रेम,ज्ञान,माहिती,आदर,मैत्री,सदभाव आहे. तुम्ही तुमचा निवडा.”      

    आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.     


फोटो सौजन्य@ science ABC                               

Comments

Post a Comment