ब्लॉग नं. 2025/349.
दिनांक: 13 डिसेंबर, 2025.
मित्रांनो,
जे नेहमी विविध रक्तचाचण्या करीत असतात,त्यांना कल्पना आहे की,त्यांच्या शरीरातून रक्त काढून ते तपासणीसाठी घेऊन जातात, किंवा ज्यांना मधुमेह आहे,त्यांच्याकडे ग्लुकोमिटर असतं,ते बोटाला टोचून रक्त काढतात आणि ते ग्लुकोमिटरला जोडलेल्या स्ट्रिपवर ठेवतात आणि आणि ग्लुकोमिटर त्यांची शुगर लेवल दर्शविते. पण ज्यांना वारंवार बोटाला टोचून घेणे पटत नाही,आवडतं नाही, ते CGM म्हणजे Continuous Glucose Monitoring System किंवा सतत ग्लुकोज मॉनिटरिंग वापरतात.पण या CGM ने जो हैदोस अमेरिकेत आणि जगात घातला आहे. त्यापेक्षा बोटाला टोचून घेणे बरे असे म्हणायची वेळ,अमेरिकेत ज्यांनी हे CGM लावून घेतले आहे,त्यांच्यावर आली आहे. आजचा ब्लॉग आहे,याच विषयावर.
सविस्तर:
अमेरिकेत नेमके काय झाले हे सांगायच्या आधी,आपण CGM म्हणजे काय आणि ते नेमके काय काम करते ते जाणून घेऊ.
📟 सतत ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) म्हणजे काय?
CGM म्हणजे Continuous Glucose Monitoring System हे उपकरण आहे,ज्यात त्वचेखाली एक छोटा सेन्सर बसवून, 24 तास रक्तातील साखरेची पातळी मोजते.ही माहिती हे उपकरण,मोबाईल किंवा इतर उपकरणावर पाठवते. यामुळे, वारंवार बोट टोचण्याची गरज भासत नाही आणि रुग्णांना रिअल टाइममध्ये साखरेचा चढ-उतार दिसतो. परंतु जर हे तंत्रज्ञानच चुकीचे असेल, तर ते जीवघेणे ठरू शकते.
FDA च्या माहितीनुसार, FreeStyle Libre 3 आणि FreeStyle Libre 3 Plus हे ग्लुकोज सेन्सर्स चुकीचे रक्तातील कमी साखरेचे रीडिंग दाखवत आहेत.यामुळे रुग्ण, गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स घेतात, इन्सुलिन डोस उशिरा घेतात किंवा वगळतात आणि चुकीचे वैद्यकीय निर्णय घेतात. FDA स्पष्ट शब्दांत सांगते की,अशा चुकीच्या निर्णयांमुळे गंभीर दुखापत, कोमा किंवा मृत्यूही होऊ शकतो.**
🌍 सध्या किती लोक या धोक्यात आहेत?
अहवालानुसार, अमेरिकेत तयार झालेले सुमारे 30 लाख सेन्सर्स संशयाच्या भोवऱ्यात आहेत, CGM च्या या चुकीच्या निर्णयामुळे 14 नोव्हेंबरपर्यंत जगभरात 7 मृत्यू आणि 736 गंभीर जखमा नोंदवल्या गेल्या आहेत.अमेरिकेत 57 जखमा झाल्या असून मृत्यूची नोंद नाही
यामुळे FDA ने तातडीने, वितरक, रुग्णालये आणि फार्मसी यांना हे सेन्सर्स विक्रीतून आणि वापरातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
⚠️ मधुमेह: भविष्यातील मोठा धोका:
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 77 दशलक्षांहून अधिक लोकांना सध्या मधुमेह आहे.जवळपास 2.5 कोटी लोक ‘मधुमेहपूर्व अवस्थेत’ आहेत, म्हणजेच भविष्यात त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे.म्हणजेच योग्य उपचार, अचूक उपकरणे आणि वेळेवर निदान न झाल्यास भविष्यात ही समस्या महामारीचे (Epidemic) रूप घेऊ शकते.
✅ रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
जर तुम्ही किंवा तुमचे जवळचे, FreeStyle Libre 3 किंवा Libre 3 Plus सेन्सर वापरत असाल, तर त्वरित, आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा,पर्यायी ग्लुकोज तपासणी पद्धती वापरा, लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका
✍️ समारोप:
ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते, तंत्रज्ञान जितके उपयुक्त, तितकेच ते धोकादायकही असे असू शकते. मधुमेहासारख्या गंभीर आजारात अचूक माहितीच जीवन वाचवू शकते. रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य संस्थांनी याकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज आहे.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

नेहमीप्रमाणे हा ब्लॉग पण अतिशय उपयुक्त आहे
ReplyDeleteधन्यवाद प्रसाद सर
मिलिंद निमदेव
खूपच माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा लेख
ReplyDeleteमहत्वपूर्ण माहिती
ReplyDelete