ब्लॉग नं. 2025/294.
दिनांक: 19 ऑक्टोबर, 2025.
मित्रांनो,
काल धन त्रयोदशी झाली आणि उद्या नरक चतुर्दशी.आज मात्र काहीच नाही.सध्या
आपण दिवाळी किंवा दीपावली,हा आपला सर्वात मोठा सण साजरा करत आहोत.या सणाला जसं
पौराणिक महत्व आहे,तसंच त्याला एक व्यवसायिक संबंधाची जोड देखिल आहे.खरीपाचा हंगाम
संपून शेतकऱ्याच्या हाती चार पैसे येतात.पूर्वीच्या काळी सर्व काही शेतकऱ्याच्या
हातच्या पैश्यावर अवलंबून असायचं आणि एकदा शेतकऱ्याच्या हातात पैसे आले की,ते
आपल्या मनात वर्षभरात साठवून ठेवलेली कामे सुरू करीत असत.यावर आहे आजचा ब्लॉग.
सविस्तर:
दिवाळी हा एक सण एक उत्सव आहे.कारण दिवाळी ही आपण साजरी करत
असतो.दिवाळी साजरी करण्यामागे,चार हातांना काम मिळणे हा उद्देश होताच.अगदी
दिवाळीचा पहिला दिवस घेतला तर,सुरुवात होत असे बाहेर रांगोळी काढण्यापासून ते
त्यात रंग भरण्यापर्यंत.हे रांगोळी साहित्य आणि रांगोळीचे
रंग तयार करणाऱ्या कारागिरांना,काम आणि पैसे या निमित्ताने मिळत असतं.रांगोळी नंतर
पणत्या लावल्या जातं.पणत्या तयार करण्याचे काम कुंभार वर्ग करीत असे.दिवाळीचा सण
हा त्यांच्यासाठी एक उत्पन्न कामवण्याचे साधन होते.पण त्यासोबतच काही लोकांकडे,लक्ष्मी
पूजनासाठी लक्ष्मीची मूर्ती घरी नेत असतात,त्या कुंभार बनवीत
असत.फुलांचे हार,फुलं विकणाऱ्याना या काळात रोजगार मिळत असे.
अभ्यंग स्नानासाठी सुवासिक उटणे आणि सुवासिक तेले बनविण्याची आणि ते
विकण्याची दिवाळी, म्हणजे मोठी संधी.कारण दिवाळी शिवाय कधी उटणे वापरले जाते हे
ऐकिवात नाही.लक्ष्मी पूजनासाठी छोटा झाडू ज्याला फडा म्हणतात,त्याची पूजा अलक्ष्मीची पूजा म्हणून केली जाते,त्या
फडयाची निर्मिती करणाऱ्याना या दिवसांत खूप मागणी असे.इतर दिवसांत केरसुणी
किंवा कुंचा वापरणारे सुद्धा,या दिवसांत फडा विकत घेतात.सणासाठी नवीन कपडे
विकत घ्यायची प्रथा होती.जेव्हा मनात आलं तेव्हा बाजारात गेले आणि नवीन कपडे विकत
आणले,असे तेव्हा नसत असे.मुख्य म्हणजे कापड घेऊन शिंप्याकडून (टेलर कडून) कपडे
शिवून आणले जातं.त्या निमित्ताने त्यांना मोठं काम मिळत असे.मला आठवतंय एक तर
दसऱ्याला किंवा दिवाळीला नवीन कपडे मिळत असतं.बाकी नवीन कपडे म्हणजे म्हणजे शाळेचा
युनिफॉर्म.
कोजागिरी पासून घराच्या दारासमोर,आकाश कंदील किंवा आकाशदिवा लावला
जाई.ज्यांना हौस होती ते स्वतः बनवीत असतं अन्यथा आकाशदिवा बनविणे आणि विकणे,हे
सुद्धा एक अतिरिक्त रोजगाराचे साधन होते.शिवाकाशीला कुणी
शिवकाशी म्हणतं, फटाक्यांचे घरोघरी उत्पादन होत असे.ते फटाके
विकण्याचे दुकान लावून,अतिरिक्त उत्पन्न कमावले जात असे.तसेच चकल्याची भाजणी,बेसन इत्यादिच्या दळणाच्या निमित्ताने, ज्यांच्याकडे चक्की होती,त्यांना सुद्धा अतिरिक्त उत्पन्न होत असे.
धनतेरसला चांदी किंवा सोन्याचे अलंकार किंवा वस्तु विकत घेतल्या जात
असतं.त्यामुळे सोनारांना देखिल अतिरिक्त प्राप्ती होत असे.ज्यांची सोने-चांदीच्या
वस्तु खरेदी घेण्याची ऐपत नसायची,ते तांबे किंवा पितळ याच्या वस्तु खरेदी
करत असतं.त्यामुळे त्या कारागिरांना आणि दुकानांना उत्पन्न होत असे.पूर्वी
सणासुदीला स्त्रिया नवीन बांगड्या भरून घेत असतं.त्यामुळे कासार घरोघरी फिरत असतं.
त्याची सुद्धा या सणाच्या दिवसांत कमाई होत असे.यासोबत किराणा दुकानात,किराणा
मालाची दिवाळीसाठी अतिरिक्त विक्री होत असे.अशा प्रकारे बारा बलुतेदारांसाठी,दिवाळी
हा सण म्हणजे एक आनंद पर्वणी असायचा.त्या दृष्टीने दिवाळी सणाचे नियोजन असावे असे
कधी कधी वाटते.
गणपती, गौरी हे संपूर्णतः धार्मिक सण
आहेत.स्नान वगैरे आटोपल्यावर उपवास ठेवून गणपतीची किंवा गौरीची स्थापना केली
जाते.दिवाळीत असे काही बंधन नसते.लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी करण्यात येते.त्यामुळे
सकाळी दिवाळीच्या खास पदार्थांचा फराळ,त्यानंतर सणानिमित्त
दुपारी गोडाधोडाचे जेवण करुन,मग संध्याकाळी निवांतपणे लक्ष्मीपूजन करण्यात येते.वाचकांपैकी
कुणी जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर उपवास करुन,लक्ष्मीपूजन करणारे असेल तर
कृपया माझ्या नजरेस आणून द्यावे.सांगायचे प्रयोजन हे की दिवाळी हा पूर्णतः उत्सव
आहे.
समारोप:
आज देखिल वर जे जे लिहिले ते होत आहे,पण आता या सर्वाच्या जोडीने
दिवाळीच्या सणाला,लोक घराची खरेदी करतात,धनतेरसला वाहन,ज्याला व्हाइट गुडस म्हणतात ते फ्रीज,वॉशिंग मशीन,
मिक्सर, किंवा लॅपटॉप,मोबाईल
खरेदी करत असतात.एकूण काय आता खरेदीची साधने बदलली.पण उत्साह तोच कायम आहे.
दिवाळीला बोनस देण्याची प्रथा ही त्या निमित्ताने,एखादी मोठी
वस्तु घेता यावी यासाठी आणि हा उत्सव अधिक उत्साहाने,उल्हासाने
आणि आनंदाने साजरा करता यावा यासाठी असावी असे वाटते.एकंदरीत काय दिवाळी हा एक सण तर
आहे पण ही एक व्यवसायाची संधी देखिल आहे.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
(आरोग्य आणि
जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

Well expressed thoughts
ReplyDelete