:दूधावरील साय: फायदे, गैरसमज आणि आरोग्यदृष्टीने विचार:
भारतीय स्वयंपाकघरामध्ये दूध हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि बहुपयोगी घटक आहे.दूध उकळल्यानंतर आणि थंड झाल्यावर,त्यावर तयार होणारा घट्ट थर म्हणजेच साय होय.ही आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून,घरगुती तुपासाठी वापरली जाते.परंतु अलीकडच्या काळात साय खाण्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.सायीमुळे कोलेस्ट्रॉल वाढते का? वजन वाढते का? की आरोग्यासाठी फायदेशीर आहे? असे बरेच प्रश्न पुढे उभे रहातात.चला,मग आजच्या ब्लॉग मधे याचा सविस्तर परामर्श घेऊया.
सविस्तरः
साय म्हणजे काय? तर दूध उकळल्यावर,त्यात तयार होणारा घट्ट थर म्हणजे साय.हा नैसर्गिकरित्या तयार होणारी दुग्धजन्य पदार्थ आहे,ज्यामध्ये फॅट्स (चरबी), प्रथिने (प्रोटीन्स), आणि जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) भरपूर प्रमाणात असतात.काही लोक याचा वापर पोळ्यांवर,भाकरीवर,गरम भातावर किंवा दह्यासोबत करतात. अनेक घरांमध्ये साय साठवून त्यापासून चविष्ट तूप बनवले जाते.
सायीमुळे कोलेस्ट्रॉल वाढते का?
हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. साय ही प्राणी-आधारित पदार्थ असल्यामुळे,त्यात कोलेस्ट्रॉल असते. 100 ग्रॅम सायीमध्ये सुमारे 68 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते.परंतु,याचा अर्थ असा नाही की,साय खाल्ल्याने तुमच्या शरीरात लगेचच,कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अनियंत्रित होईल.
डॉ. सीमा गुप्ता (आयुर्वेद मार्गदर्शक) सांगतात की,जर तुम्ही मर्यादित प्रमाणात सायचे सेवन केले,तर ती कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण ठरत नाही.आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार,रोजचे कोलेस्ट्रॉलचे सेवन 300 मिलीग्रॅमच्या आत असावे.त्यामुळे थोड्या प्रमाणात घेतलेल्या सायीमुळे,तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
साय आणि वजन:
साय ही उच्च फॅटने युक्त असते,त्यामुळे अनेकजण वजनवाढीच्या भीतीने ती टाळतात.परंतु ही भीती अर्धवट माहितीवर आधारित आहे.सायीमध्ये असलेले नैसर्गिक फॅट्स,उपयुक्त ऊर्जा स्रोत असून,ते पचनास मदत करतात आणि उपवासाच्या वेळेस किंवा सकाळी घेतल्यास,दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रणात राहू शकते.पण हो,सायीचे अति सेवन केल्यास मात्र, वजनवाढ होऊ शकते,याची नोंद घ्यायला हवी.
साय खाण्याचे आरोग्यदायी फायदे:
साय म्हणजे केवळ चव वाढवणारा घटक नाही, तर तो अनेक पोषणमूल्यांनी परिपूर्ण पदार्थ आहे. याचे विविध फायदे खालीलप्रमाणे:
1. हाडांसाठी फायदेशीर:
सायीमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते,जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.
2. त्वचेसाठी पोषक:
सायीमध्ये असलेले नैसर्गिक फॅट्स आणि प्रथिने त्वचेला पोषण देतात.यामुळे त्वचा मुलायम,उजळ आणि तजेलदार बनते.
3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:
सायीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि ई,हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात,ज्यामुळे तुमचे शरीर विविध आजारांपासून सुरक्षित राहते.
4. मेंदूसाठी उपयुक्त:
सायीमधील हेल्दी फॅट्स,मेंदूच्या पेशींना ऊर्जा देतात व मेंदूचे कार्य सुधारतात.संतृप्त फॅट्सच्या योग्य प्रमाणातील सेवनामुळे मेंदूचे आरोग्य टिकते.
साय खाण्यासाठी योग्य वेळ आणि प्रमाणः
1.सकाळी नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात साय घेणे उपयुक्त ठरते.
2.दिवसभरात २ ते ३ चमचे साय हे योग्य प्रमाण मानले जाते.
3.थंडीच्या दिवसात साय खाणे अधिक फायदेशीर असते, कारण ती शरीराला उष्णता आणि ऊर्जा देते.
समारोपः
दूधावरील साय ही केवळ पारंपरिक नाही, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक पोषणमूल्यपूर्ण घटक आहे. जर ती योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस खाल्ली,तर ती शरीरासाठी हितकारक ठरते. कोलेस्ट्रॉल व वजनवाढ याबाबत सायवर खापर फोडणे चुकीचे ठरते. मर्यादित सेवन, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हेच आरोग्य टिकवण्याचे खरे सूत्र आहे.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
✍🏻 लेखक: प्रसाद नातु
(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
खूप छान माहिती
ReplyDelete